

देवळाली कॅम्प : भगूर परिसरातील दारणा नदीकाठी असलेल्या शेतीमळ्यात अनेक प्राण्यांवर बिबट्याकडून हल्ले होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.
दोन दिवसांपूर्वी भगूर जवळील शिवडा गावातील एका शेतकऱ्याच्या वासराचा बिबट्याने शिकार करून फडशा पाडला. ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नदीकाठच्या पिकांच्या आश्रयाने बिबट्या या भागात दिवसाढवळ्या वावरत असून, रात्रीच्या वेळी तर थेट रस्त्यावर आणि फार्महाउसच्या परिसरात ठाण मांडून बसत आहे. वारंवार तक्रार करूनही वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी केला आहे.
भगूर नगर परिषदेचे नगरसेवक प्रसाद आडके यांची दारणा नदीपलीकडे शेती असून, तिथेच त्यांचे निवासस्थान (फार्महाउस) आहे. रात्री 9 ते 10 च्या दरम्यान भगूर-राहुरी मळे रस्त्यावरून घरी जाताना त्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे. याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो त्यांनी पुराव्यादाखल काढले आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी सायंकाळी 7 वाजताच दरवाजे बंद करून घेत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे किंवा इतर शेतीकामे करणे अशक्य झाले आहे.
वनविभागाने या गंभीर परिस्थितीची त्वरित दखल घेऊन भगूर मळे परिसरात पिंजरा लावावा आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.जर वनविभागाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांच्या वतीने मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपचे भगूर - देवळाली मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक प्रसाद आडके यांच्यासह प्रशांत करंजकर, बाजीराव गोडसे, महेश डोंगरे, विकास आडके, शरद करंजकर, दिनेश कनोजिया, माजी सरपंच संगीता घुगे, सुभाष वाघ, संपत घुगे, रमेश सांगळे, बाळू सांगळे, अंबादास आडके यांनी दिला आहे.