

देवळाली कॅम्प : स्वा. वि. दा. सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगूरला जागतिक नकाशावर आणण्यासाठी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्याचे तत्कालीन पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोठ्या दिमाखात सावरकर थीम पार्क व संग्रहालय आणि देशातील पहिल्या सावरकर 'पर्यटन सर्किट' ची घोषणा केली होती. मात्र ४ वर्षे उलटूनही प्रत्यक्षात एक वीटही रचली गेली नसल्याने सावरकरप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
मंत्री लोढा यांनी मे २०२३ मध्ये निविदा मागवून २८ मे २०२४ रोजी सावरकर जयंतीदिनी प्रकल्प पूर्ण करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. ती डेडलाइनही उलटून दोन वर्षे झाली, तरी भगूरच्या जमिनीवर प्रकल्पाचे नामोनिशाण नाही. त्यामुळे हा प्रकल्प फक्त कागदावरच राहण्याची शंका उपस्थित होत आहे.
'सावरकर पर्यटन सर्किट'मध्ये सावरकरांच्या जीवनाशी निगडित ऐतिहासिक ठिकाणांचा समावेश होता. भगूरमधील सावरकर उद्यान, अष्टभूजा देवी मंदिर, नाशिकमधील अभिनव भारत मंदिर, पुण्यातील सावरकर अध्यासन केंद्र, रत्नागिरीचे पतितपावन मंदिर आणि सांगलीतील ऐतिहासिक स्थळे या सर्किटमध्ये जोडली जाणार होती. भगूर हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे केंद्र आहे. सावरकरांच्या विचारांनी आणि कानि प्रेरित होऊन त्यांच्या स्मृतींना जागतिक स्तरावर नेण्यासाठी 'थीम पार्क' व 'पर्यटन सर्किट' अत्यावश्यक आहे. प्रकल्प रखडल्याने भगूरसह नाशिक जिल्ह्यातील सावरकरप्रेमींमध्ये निराशा आहे.
भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाचे मनोज कुवर, प्रशांत लोया, योगेश बुरके, मंगेश मरकड, भूषण कापसे, संभाजी देशमुख, सुनील जोरे, प्रवीण वाघ, आकाश नेहरे, संतोष मोजाड, नीलेश हासे आदींनी या कामांसाठी सतत पाठपुरावा केला आहे.
घोषणांचा टाइमलाइन २६ फेब्रुवारी २०२३ :
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून 'थीम पार्क' व 'पर्यटन सर्किट'ची घोषणा
मे २०२३ : निविदा मागवण्याचे आश्वासन
२८ मे २०२४ : सावरकर जयंतीदिनी प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाइन
मे २०२६ : ४ वर्षानंतरही काम शून्य, एक वीटही रचली नाही
'सावरकर सर्किट'मध्ये काय होते
भगूर : सावरकर उद्यान, अष्टभूजा देवी मंदिर
नाशिक : अभिनव भारत मंदिर
पुणे : सावरकर अध्यासन केंद्र
रत्नागिरी : पतितपावन मंदिर
सांगली : सावरकरांशी संबंधित ऐतिहासिक स्थळे