

नाशिक : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शाह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषदेच्या १७ जागांच्या जागावाटपासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बुधवारी (दि. २७) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याचा दावा केला जात असला, तरी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागांवरून भाजप आणि शिवसेनेचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे दिल्लीत बैठक होऊनही नाशिकचे घोडं अडलंच आहे.
दरम्यान, आता मुंबईत नाशिकच्या तिढा सोडविला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधान परिषदेच्या १७जागांपैकी १२ जागांवर भाजप निवडणूक लढवणार असून, शिंदे गटाला तीन आणि अजित पवार गटाला दोन जागा देण्याचे प्राथमिक सूत्र ठरले आहे. मात्र, नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. यातच, पुण्याची जागा
राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मागितली आहे. त्यामुळे या जागांवरून महायुतीत पेच निर्माण झाला आहे. हा पेच सोडविण्यासाठी बुधवारी केंद्रीय अमित शहा यांच्या समवेत बैठक झाली. मात्र, या बैठकीनंतर जागा वाटपाचा पेच सुटलेला नाही. याबाबत खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागावाटपाबाबत सूचक वक्तव्य करत केवळ दोन ते तीन जागांवर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे स्पष्ट केले.
नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागांवर शिवसेनेसोबत, तर पुण्याच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपची सध्या चर्चा सुरू आहे. सध्या याच जागांवर आमचे घोडं अडलं आहे, जे आम्ही मुंबईत सोडवून घेऊ असे त्यांनी सांगितले. कठीण पेपर संपलाय, आता सोपा पेपरही आम्ही सोडवून घेऊ. सगळी तयारी झाली आहे, फक्त अंतिम टीकमार्क करायचे बाकी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा हा मुंबईतच सोडविला जाणार आहे.
इच्छुकांची भाऊगर्दी वाढली
नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नसताना दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी वाढत चालली आहे. भाजपात शहरातील अर्धा डझन इच्छुक असतानाच चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी अर्ज खरेदी केला आहे. केदा आहेर यांनी अर्ज घेतल्यानेच कासलीवाल यांचे नाव पक्षातील वरिष्ठांनी पुढे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादीनेही जागेवर दावा केला असून शिवाजी सहाणे, गोरख बोडके यांनी थेट अर्ज खरेदी केला. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे