

नांदगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलिस ठाण्यात अदाखल पात्र गुन्हा दाखल झाला आहे. भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अश्लील, अपमानास्पद, वैयक्तिक स्वरुपाची आणि सामाजिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष संजय सानप यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्ष ही एक रेव्ह पार्टी आहे. गिरीश महाजन नावाचा सांड हा मोकाट सुटलेला आहे. याला जर आवरले नाही तर एक दिवस देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात केले होते.
तत्पूर्वी या वक्तव्याच्या विरोधात संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात मोर्चा काढत खासदार राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी भाजपा नांदगाव मंडल अध्यक्ष संजय सानप, रेखा शेलार, सतीश शिंदे, बाबाजी शिरसाठ, ताराबाई शर्मा, धनराज मंडलिक, बळवंत शिंदे, दिनेश जेजूरकर, कृष्णा देहाडराय, गणेश शर्मा, नितीन रावआंदोरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.