

मुंबई: पुणे येथील रेव्ह पार्टी प्रकरणी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
"खडसेंनी गिरीश महाजनांविरोधात पुरावे देताच २४ तासांत त्यांच्या कुटुंबावर कारवाई झाली. हा सूडबुद्धीचा प्रकार असून, गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटला आहे. तो एक दिवस देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही," अशा अत्यंत स्फोटक शब्दांत राऊत यांनी हल्लाबोल केला.
एकनाथ खडसे यांच्या जावयावरील कारवाई हे राजकीय षडयंत्र असल्याचा थेट आरोप संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले, "या सरकारमध्ये कधी कोणाला अटक होईल, हे सांगता येत नाही. सरबत पिणाऱ्यालाही दारू पितो म्हणून अटक केली जाईल. दोन दिवसांपासून खडसे सरकारविरोधात, गिरीश महाजन यांच्या विरोधात पुराव्यांसह बोलत होते आणि त्यानंतर लगेचच ही कारवाई झाली. जो आरोप करतो, त्याच्याच घरावर धाडी घालायच्या, हे भाजपचे तंत्र असल्याचेही ते म्हणाले. राऊत यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करत म्हटले, "भाजपमध्ये येण्यासाठी आधी गुन्हे दाखल करायचे आणि पक्षात आल्यावर ते काढून टाकायचे, हे एक नवीन तंत्र सुरू झाले आहे. एकनाथ खडसे यांच्या कुटुंबाला फडणवीसांच्या राज्यात अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागेल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी अमित साळुंखे प्रकरणावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले. अमित साळुंखेला झारखंड पोलीस ताब्यात घेतील, ते भाजपचे पोलीस नाहीत. आता तपासात कळेल की, स्पेनला स्पेशल चार्टर्ड फ्लाईटने कोणाला नेले होते? त्या विमानात कोणती पार्टी चालली होती? अमित साळुंखेने हा खर्च कोणासाठी केला? त्या आठ तासांच्या प्रवासात विमानात काय सुरू होतं? याचे सर्व पुरावे मिळतील. मिस्टर श्रीकांत शिंदे, थोडा धीर धरा. तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना उत्तर द्यावे लागेल."
अमित शहांना पंतप्रधान होण्याची महत्त्वकांक्षा आहे आणि त्या दृष्टीने त्यांची पावले पडत आहेत. पण नरेंद्र मोदी त्यांना पंतप्रधान होऊ देणार नाहीत. कदाचित ते अमित शहांना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पाठवतील. भाजपचे चार खासदार आणि १५-१६ आमदार हनी ट्रॅपमुळेच तिकडे गेले आहेत. नशेची पार्टी आणि हनी ट्रॅप हे सर्व भाजपच निर्माण करत आहे. पुरावे शोधण्याचे काम तपास यंत्रणांचे आहे. आम्ही भ्रष्टाचार उघड करतो, पण पोलीस, ईडी, अँटी करप्शन काय तुमच्या घरची भांडी घासायला आहेत का? यंत्रणांचा वापर फक्त राजकीय विरोधकांना बदनाम करण्यासाठी सुरू आहे, असा हल्लाबोल देखील राऊत यांनी सरकारवर केला आहे.