

पुणे: पुण्यातील चर्चित रेव्ह पार्टीवर रविवारी (दि.२७) पहाटे पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी अटक केल्यानंतर सर्व आरोपींची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीतून प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यपान केल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात आरोपींपैकी फक्त प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण पॉझिटिव्ह आढळले. उर्वरित पाच आरोपींमध्ये मद्यपानाचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. मात्र, या पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन झाले होते का? याबाबतचा अंतिम निष्कर्ष न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या (Forensic Science Laboratory) अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
सदर प्रकरणातील सर्व आरोपींना रविवारी (दि.२७) सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सातही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे पुण्यातील रेव्ह पार्टी संस्कृतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिस तपास सुरू असून, पुढील अहवालानंतरच अंमली पदार्थांच्या वापराबाबतची माहिती मिळणार आहे. सध्या प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव या दोघांनी मद्यपान केल्याची वैद्यकीय तपासणीतून पुष्टी झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.