

शेखर जोशी
आपण तयार केलेली कलाकृती राष्ट्रपती भवन सारख्या सर्वोच्च वास्तूत स्थापन होणे हा माझ्या आजवरच्या कलाकारकीर्दीचा सर्वात मोठा सन्मान आहे, अशी भावना नाशिक येथील शिल्पकार संदीप लोंढे यांनी व्यक्त केली. आमच्या लोंढे घराण्यातील तिसरी पिढी आमचा कलावारसा जतन आणि संवर्धन करून पुढे नेत आहे. ही गोष्टही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची असल्याचेही लोंढे म्हणाले.
स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल, लेखक, इतिहासकार सी. राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी यांचा अर्धपुतळा नुकताच राष्ट्रपती भवनात बसविण्यात आला असून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते २३ फेब्रुवारी २०२६ या दिवशी त्याचे अनावरण झाले. सी. राजगोपालाचारी यांचा कांस्य धातूतील हा अर्धपुतळा लोंढे यांनी तयार केला आहे. या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते.
माझ्यासह इतरही काही कलाकार/ शिल्पकार यांनीही सी. राजगोपालाचारी यांच्या अर्धपुतळ्याची माती कामातील छोटी प्रतिकृती आधी राष्ट्रपती भवनात सादर केली. सुमारे दोन ते अडीच फूट उंचीचा अर्धपुतळा तयार करायचा होता. पुतळा तयार करण्याआधी मी राजगोपालाचारी यांच्यावरील पुस्तके वाचली, त्यांच्यावरील माहितीपट पाहिला.
त्यांची चालण्याची, बोलण्याची ढब, हसण्याची पद्धत यांचा अभ्यास करून ते सर्व भाव चेहऱ्यात उतरविण्याचा प्रयत्न केला. तयार केलेल्या पुतळ्याची छायाचित्रे, चित्रफीत पुन्हा राष्ट्रपती भवनात पाठवली. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना ती प्रतिकृती दाखविण्यात आली. पुन्हा एकदा सर्व प्रकारची छाननी, निकष लावून पुतळ्याच्या प्रतिकृतीला मान्यता दिली गेली आणि त्यानंतर कांस्य धातूत हा अर्धपुतळा तयार करण्यासाठी मला सांगितले गेले, असे लोंढे यांनी सांगितले.
आपण आजवर ज्यांना टीव्हीवर पाहत आलो ते उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा , शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली, संवाद साधता आला, त्यांनी तसेच राजगोपालाचारी यांच्या कुटुंबीयांनीही आवर्जून कामाचे कौतुक केले. या अर्धपुतळ्याचे राजाजींच्या चेहऱ्याशी खूपच साम्य असून त्यांची हसण्याची जी ढब होती, ती तुम्ही बरोबर उचलली आहे, अशा शब्दात राजगोपालाचारी कुटुंबीयांनी कौतुक केल्याचे लोंढे म्हणाले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच प्रवेश झाला. राष्ट्रपती भवनाची भव्यता, सौंदर्य अंगावर येणारे आहे. अनेक मान्यवर आणि तीनही सैन्य दलाचे मोठे अधिकारी तिथे उपस्थित होते, मात्र आपल्या उपस्थितीचे कोणतेही दडपण त्यांनी येऊ न देता अतिशय सहजतेने ते आमच्याशी बोलत होते, असेही लोंढे यांनी सांगितले.
दरम्यान राष्ट्रपती भवनातील खुल्या पायऱ्यांच्या एका कोपऱ्यात पूर्वी जिथे ब्रिटिश वास्तुविशारद एडविन ल्युटीयन्स यांचा पुतळा होता, त्याच जागी राजगोपालाचारी यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या १३१ व्या भागात लुटियन्स यांच्या पुतळ्याच्या जागी सी. राजगोपालाचारी यांचा अर्धपुतळा बसवण्याची घोषणा केली होती. देश आता गुलामगिरीची चिन्हे मागे सोडत असून भारतीय संस्कृतीशी निगडित प्रतीकांना प्राधान्य देत असल्याचे मोदी या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते. ज्या इमारतीची रचना स्वतः ल्युटियन्स यांनी केली होती, त्याच इमारतीतून त्यांची प्रतिमा आता हटवण्यात आली आहे.