

पणजी : प्रभाकर धुरी
आई, बहिणीकडून मिळालेला कलेचा वारसा आणि त्याला माझ्या अविरत कष्टाची जोड, यामुळेच मी जगण्याची लढाई लीलया जिंकू शकले, असे ताळगाव, पणजी येथील निकिता सदानंद मोरजकर यांनी सांगितले. माझ्या पतीचे निधन १५ वर्षांपूर्वी झाले. त्यानंतर या कलेच्या माध्यमातून मी हिमतीने संसार उभा केला, तिन्ही मुलांना पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनविले, असेही त्या अभिमान आणि विनम्रतेने म्हणाल्या.
पणजी येथे कला अकादमी जवळ दर्यासंगमावर सुरू असलेल्या लोकोत्सव महोत्सवात निकिता मोरजकर यांनी विविध देखण्या आणि बहुपयोगी वस्तूंचा स्टॉल घातला आहे. गेली ३५ वर्षे त्या हस्तकलेच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तू देशभरातील वेगवेगळ्या प्रदर्शन आणि महोत्सवात विक्रीसाठी घेऊन जातात. त्यांनी आतापर्यंत गोव्यातील विविध ठिकाणांसह मुंबई, दिल्ली, ओडिशा, सुरजकुंड, चंदीगढ, लुधियाना, केरळ येथील वेगवेगळ्या प्रदर्शन, महोत्सवांमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे.
देशातील विविध भागांत त्या गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघु उद्योग विकास महामंडळ यांच्यामार्फत आप्रांत मांड प्रदर्शनात, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या सरस प्रदर्शनात आणि हस्तकला विकास आयुक्त कार्यालयाच्या (वस्त्रोद्योग मंत्रालय) वतीने गांधी शिल्प प्रदर्शनात हस्त कारागीर म्हणून हस्तकला प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. तिथे त्यांनी बनवलेल्या वस्तूंना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
अर्थात, यामागे त्यांचे अविरत कष्ट, मेहनत आणि जिद्द आहे. निकिता मोरजकर चांगल्या प्रकारे विणकाम, एम्ब्रॉयडरी आणि पेंटिंगपण करतात, युवतींमध्ये सध्या ट्रेंड असलेल्या चकाकणाऱ्या नायलॉन धाग्यांपासून आणि हार्ड कव्हर मटेरियल आत चिकटवून देखण्या हॅन्ड पर्स हाताने बनवतात.
शिवाय लोकरीपासून दरवाजाला लावायची तोरणे, ताटावर, टेबलवर घालायचा टॉवेल (टेबल क्लॉथ), लोकरीने विणकाम केलेल्या रंगीबेरंगी की चेन, टेबल सेंटर पीस, सोफा रनर, हाताने एम्ब्रॉयडरी केलेले, पॅच वर्क केलेले, तसेच मशीन एम्ब्रॉयडरी केलेले उशीचे अभ्रे व बेडशीट, पेंटिंग केलेले उशीचे अभ्रे, विणकाम करून बनवलेले ईअरिंग्ज अशा विविध वस्तू त्या कलात्मक पद्धतीने बनवतात.