

नाशिक : भारतीय रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या जिल्हा बँकांचे आर्थिक सुदृढीकरण आणि कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नफ्यात आणण्यासाठी पुढाकार योजना दिली. याअंतर्गत बँकेच्या ठेवीत वाढ करण्यासाठी बँकेने शाखा/ सेवकांना उद्दिष्ट दिले आहे. वैयक्तिक नवीन 10 ठेवीदाराकडून प्रत्येक सेवकाने दरमहा 10 हजार रकमेची 100 दिवस कालावधीची मुदतठेव जमा करावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी मैदानात उतरले आहेत.
राज्यातील नागपूर, बुलढाणा, नाशिक जिल्हा बँक अडचणीत आल्या आहेत. या बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाने आर्थिक बळ दिले आहे. यापुढे जात आता आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या या जिल्हा बँकांचे आर्थिक सुदृढीकरण आणि कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने या बँकेसाठी नवीन योजना दिली. या अनुषंगाने जिल्हा बँक प्रशासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रक काढले आहे. यात बँकेने या अंतर्गत बँकेची आर्थिक स्थितीत सुधारणेसाठी सन 2025-26 ते 2027 - 28 या तीन आर्थिक वर्षांसाठी बँक नफ्यात आणण्यासाठी पुढाकार योजना तयार करत नाबार्डला पाठवली आहे.
या अनुषंगाने ठेवीत वाढ करण्यासाठी बँकेने शाखांसह सेवकांना उद्दिष्ट दिले आहे. परंतु, आर्थिक वर्ष 2025-26 पूर्ण होण्यासाठी तीन महिने शिल्लक आहे. मार्च 2026 पर्यंत निर्धारित केलेले ठेव उद्दिष्ट साध्य करणे जिकिरीचे झाले आहे. तथापि, केंद्र कार्यालय अधिकारी व केंद्र कार्यालय विभाग आणि नाशिक तालुका शाखेत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार, वैयक्तिक नवीन 10 ठेवीदारांकडून प्रत्येक सेवकाने दरमहा 10 हजार रकमेची 100 दिवस कालावधीची मुदतठेव जमा करावी, असे जानेवारी ते मार्च 2026 या तीन महिन्यांसाठी सलग करावे. यासाठी नवीन ठेव योजना तयार करण्यात आली आहे.
शाखांनी ग्राहकांसोबत आग्रही राहावे
या योजनेद्वारे बँकेत वैयक्तिक ग्राहकांचे व्यवहार वाढीस लागावे, शाखा व्यवहारांवर विश्वास निर्माण व्हावा, असे बँकेचे उद्दिष्ट असल्याने शाखांनी ही योजना प्रभावीपणे राबवावी. ही ठेव योजना बँक प्रायोगिक तत्त्वावर राबवत असून, सर्व सेवकांनी सांघिक प्रयत्न करत ठेवीदारांना भेटी देत या योजनेबाबत समुपदेशन करावे. जास्तीत जास्त वैयक्तिक ठेवीदारांनी या योजनेत सहभाग घेत व्याज व बँकिंग व्यवहाराचा लाभ घेण्यास सेवकांनी प्रबोधन करावे. मुदतठेवीव्यतिरिक्त चालू बचत खात्याच्या व्यवहारातही वाढ होईल, यासाठी शाखांनी ग्राहकांसोबत आग्रही राहावे, असे बँक प्रशासनाने म्हटले आहे.
अशी आहे योजना
योजनेचे नाव : अभियान 100 दिवस
प्रतिसेवक उद्दिष्ट : कमीत कमी दरमहा 10 ठेवीदार
योजना कोणत्या ठेवीदारांसाठी लागू : वैयक्तिक
योजना कालावधी : जानेवारी 2026 ते मार्च 2026
योजनेद्वारे रक्कम स्वीकारण्याची पद्धत : रोखीने 10 हजार अथवा क्लिअरिंग चेक
ठेवीदाराचे खाते : ठेवीदाराचे बँकेत खाते आवश्यक नाही.
मुदतठेव कालावधी : 100 दिवसांसाठी मुदतठेव ठेवावी लागेल.
मुदतपूर्व नियम : मुदतपूर्व केल्यास व्याज रक्कम दिली जाणार नाही.
मुदतअंती ठेव परतीची पद्धत : व्याज व मुद्दल रोखीने परत, मागणी असेल तर चेकने
मुदतठेव व्याजदर : 3.75 टक्के दसादशे (91 ते 181 दिवस प्रचलित व्याजावर 3.25 टक्के)