

परभणी : शहर महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात विना परवानगी व अनधिकृतरीत्या उभारण्यात येणाऱ्या बॅनर व होर्डिंग्जवर महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे. निवडणूक आचार संहिता लागू असताना शहरातील विविध भागांत नियमांचे उल्लंघन करून बॅनर व होर्डिंग्ज लावण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या पथकांमार्फत तत्काळ कारवाई सुरू करण्यात आली आहे.
बुधवारी (दि.7) प्रभाग क्रमांक 7, धार रोड परिसरात उभारण्यात आलेले अनधिकृत बॅनर व होर्डिंग्ज मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काढून टाकले. या कारवाईमुळे शहरात विना परवानगी फलक लावणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पुढील काळातही अशाच प्रकारची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना विविध परवाने सुलभरीत्या उपलब्ध व्हावेत, यासाठी महानगरपालिकेने एक खिडकी परवाना कक्ष सुरू केला आहे. या कक्षामार्फत बॅनर, होर्डिंग्ज, प्रचार साहित्य आदींसाठी आवश्यक असलेले परवाने नियमानुसार वितरित करण्यात येत आहेत. असे असतानाही काहीं जणांकडून नियमांकडे दुर्लक्ष करून बॅनर उभारले जात असल्याने कारवाई अपरिहार्य ठरत आहे.
यासंदर्भात मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नितीन नार्वेकर यांनी उमेदवार व राजकीय पक्षांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. बॅनर व होर्डिंग्ज उभारण्यापूर्वी आवश्यक ती परवानगी घेणे बंधनकारक असून, केवळ परवानगी दिलेल्या ठिकाणीच प्रचार साहित्य लावावे, असे त्यांनी सांगितले. तसेच, विनापरवानगी, अनधिकृत अथवा निवडणूक आचार संहितेचा भंग करणारा मजकूर असलेले बॅनर व होर्डिंग्ज उभारू नयेत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ही दिला. महापालिकेच्या या भूमिकेमुळे शहरात शिस्तबध्द व नियमबध्द प्रचारास चालना मिळणार असून, पुढील काळातही नियमभंग करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
एक खिडकी कक्ष कार्यान्वित
मनपा निवडणूक पार्श्वभूमीवर उमेदवारांना विविध प्रकारचे परवाने मिळवण्यासाठी महापालिकेच्या वतीने एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विविध परवाने मिळवण्यासाठी होणारी गर्दी व उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी या कक्षात प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अतिरिक्त कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला. एक खिडकी कक्ष सुरू झाल्याने वाहन परवान्यांचे वितरण सुरळीत होत असून उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला. दररोज मोठ्या संख्येने अर्जदार या कक्षात येत असून त्यांचे अर्ज तत्काळ निकाली काढले जात आहेत. अर्जदारांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नितीन नार्वेकर यांनी स्वतः एक खिडकी कक्षाला भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक ठेवण्याचे निर्देश दिले.