

नाशिक : जागतिक हवामानाचे गंभीर संकट लक्षात घेऊन राज्यातील कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांना संस्कारित करत त्यांचे उन्नतीकरण करावे. प्रतिकूल परिस्थितीत देखील शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल, अशा प्रकारचे बियाणे निर्माण करावीत. कृषी विद्यापीठांनी राज्यात नैसर्गिक शेतीची क्रांती आणण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
मुंबईतील लोकभवनात राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातील कृषी व पशुविज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंशी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नुकत्याच गुजरात-महाराष्ट्रातील काही गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. तेथील जल, जमीन आणि पीक पद्धती व उत्पादनाची माहिती जाणून घेतली.
गुजरात पॅटर्न घेऊन राज्यपाल देवव्रत यांनी मागील आठवड्यात दिंडोरी तालुक्यातील पिंपराळे येथे दोन दिवस थांबत ग्रामस्थांत समरस होत गरीब, शेतकरी, सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेत नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन केले.
गुजरात-महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर राज्यपालांनी मुंबईत लोकभवनात बैठत घेतली. त्यात ते म्हणाले की, सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी नैसर्गिक शेतीच्या प्रचार-प्रसारासाठी ‘मॉडेल फार्म’ विकसित करावे. शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करावी. भावी पिढ्यांची अन्नसुरक्षा आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी नैसर्गिक शेतीशिवाय गत्यंतर नाही. आपल्या एका भेटीदरम्यान गुजरातमधील आणंद जिल्ह्यात 25 गावांत भूमिगत जलस्त्रोतांत नायट्रेट आढळून आले असून, पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. ही गोष्ट निदर्शनास आली.
दूषित पाण्यांमुळे लोकांना गंभीर आजार होत आहेत. या दृष्टीने रसायनांच्या वापराबाबत जागृती होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात साहिवाल, थारपारकर, कांकरेज, गीर या देशी गायींचे संवर्धन केले गेल्यास ते शेतीला वरदान ठरत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असेही राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितले.
बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंह, राज्यातील कृषी तसेच पशुविज्ञान विद्यापिठांचे कुलगुरू, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, ‘आत्मा’चे संचालक सुनील बोरकर व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत राज्यपालांनी मांडलेले ठळक मुद्दे
महाराष्ट्रात साहिवाल, थारपारकर, कांकरेज, गीर या देशी गायींचे संवर्धन करा.
नैसर्गिक शेतीच्या प्रचार-प्रसारासाठी ‘मॉडेल फार्म’ विकसित करा.
भूमिगत जलस्त्रोतांत वाढणारे नायट्रेटचे विष थांबवण्यासाठी जागृती करा.
जागतिक हवामानाचे संकट लक्षात घेत नैसर्गिक शेतीकडे वळा.
पारंपरिक देशी बियाण्यांना संस्कारित करत त्यांचे उन्नतीकरण करा.