

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे त्याचा फटका आता देशाला बसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पेट्रोल, डिझेल नंतर आता व्यावसायिक, घरगुती गॅसची टंचाई भासत आहे. त्यामुळे नागरिक, व्यावसायिक वैतागले आहेत. अशा परिस्थितीत आता रत्नागिरी जिल्ह्यात पीएनजी (नैसर्गिक गॅस) कनेक्शनचा पर्याय उपलब्ध झालेला आहे.
त्यामुळे रत्नागिरीकरांनो गॅससाठी ररांगेत उभे राहण्याऐवजी आता घरगुती पीएनजी कनेक्शन घ्या आणि सिलिडरसाठी रांगेत उभे राहावे लागत नाही व रोजच्या कटकटीपासून आधार मिळणार आहे.
आखाती देशात युद्धामुळे त्याचे परिणाम रत्नागिरी जिल्ह्यात जाणवू लागले आहे. गॅससाठी तासन्तास नागरिकांना बाट पाहावी लागत आहे. व्यावसायिक गॅस नसल्यामुळे काही हॉटेल्स, खानावळ, कॅन्टीन बंद झाली आहे. त्यामुळे स्थलांतरीत नागरिकांचे जेवणाचे वांदे होत आहेत. अशा परिस्थितीत युनिसन एनव्हारो प्रा.लि. कंपनीला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पीएनजी म्हणजेच नॅचरल गॅस व कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस सीएनजी वितरित करण्याच्या अधिकृत परवाना मिळालेला आहे.
याच उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातील शहराच्या परिसरामध्ये स्वच्छ आणि हरित पर्यावरणपूरक इंधन वितरण करण्याच्या उद्देशाने कंपनीची स्थापना झालेली आहे. रत्नागिरीकरांनी, हॉटेल व्यावसायिकांनी नैसर्गिक गॅस कनेक्शन घ्यावे, असे आवाहन काही दिवसापूर्वी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी जिंदल यांनी ही केले होते.
तसेच नगर परिषद, नगरपंचायतच्या वतीने घंटागाडी तसेच विविध ठिकाणी बोर्ड लावून जनजागृती करण्यात येत आहे. नैसर्गिक गॅस वापरल्यास हा गॅस एलपीजी पेक्षा स्वस्त आहे, वापरलेले गॅसचेच पैसे द्यावे लागणार आहे. या गॅसमुळे भांडी काळी होत नाहीत. है स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक इंधन आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांना पीएनजी गॅसचा पर्याच चांगला असणार आहे.
जिल्ह्यात नैसर्गिक गॅस कनेक्शन संदर्भात आम्हाला परवानगी मिळाली आहे. कनेक्शन देण्यासाठी जे काही अडथळे होते ते दूर झाले आहेत. सध्या १० हजार नागरिक पीएनजी गॅस वापरत आहेत. तसेच २६ हजारहून अधिक नागरिकांसाठी गॅस कनेक्शन देण्यासाठी पाईपलाईनसह विविध कामे झाली आहेत. त्यामुळे नागरिकांनी पीएनजी गॅस कनेक्शनसाठी जास्तीत जास्त नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी केल्यास गॅस कनेक्शन लवकर व स्वस्तात है गॅस मिळणार आहे.
आशिष प्रसाद,