

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समृद्ध जैवविविधतेत सर्पविश्वातील एक अत्यंत दुर्मीळ आणि लक्षवेधी नोंद झाली आहे. जिल्ह्यात प्रथमच कुडाळ तालुक्यातील पावशी गावातून पांढऱ्या रंगाच्या 'अल्बिनो मण्यार' (Albino Common Krait) या सापाची नोंद करण्यात आली आहे.
सर्पमित्र अनिल गावडे आणि प्राणी अभ्यासक डॉ. योगेश कोळी यांनी या सापाची नोंद केली. कुडाळ वनक्षेत्रपाल चेतन पाटील व वनपाल श्री. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्मीळ सापाचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. या घटनेमुळे सिंधुदुर्गातील सर्पविविधता आणि त्यातील अनोख्या रंगविविधतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
सामान्यतः मण्यार हा काळसर किंवा निळसर-काळसर रंगाचा असून त्याच्या शरीरावर पांढऱ्या रंगाचे अरुंद आडवे पट्टे असतात. पाठीवरील मध्यवर्ती रांगेतील मोठे षटकोनी आकाराचे खवले, गुळगुळीत शरीरावरील खवले, लहान डोके आणि तुलनेने लहान डोळे ही त्याची महत्त्वाची ओळख वैशिष्ट्ये आहेत.
मात्र अल्बिनो अवस्थेत शरीरातील रंगद्रव्याची निर्मिती अत्यंत कमी किंवा अनुपस्थित असल्यामुळे सापाचा नेहमीचा काळा रंग दिसून येत नाही. पूर्ण अल्बिनो मण्यार सापांमध्ये डोळे लालसर दिसतात.
मण्याराचे शास्त्रीय नाव बुंगारस कॅरुलियस (Bungarus caeruleus) असून तो इलापिडी या विषारी सापांच्या कुळातील आहे. मण्यार हा प्रामुख्याने रात्री सक्रिय असणारा साप आहे. दिवसा तो दगडाखाली, लाकडाच्या ढिगाऱ्याखाली, घराभोवतीच्या अंधाऱ्या जागेत, बिळांमध्ये किंवा इतर सुरक्षित ठिकाणी लपून राहतो. रात्रीच्या वेळी ते अन्नाच्या शोधात बाहेर पडतात.
सर्पमित्र अनिल गावडे यांचे योगदान
सापाचे रेस्क्यू केल्यानंतर नागरिकांमध्ये निर्माण होणारी भीती आणि गैरसमज दूर करून त्यांची सुरक्षित सुटका करणे अत्यंत महत्त्वाचे असते. सर्पमित्र अनिल गावडे यांनी प्रसंगावधान राखत समाजामध्ये जनजागृती केली. सापांना मारण्याऐवजी त्यांचे सुरक्षितपणे रेस्क्यू करून त्यांना योग्य अधिवासात सोडण्याच्या कार्यात सर्पमित्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
गावडे यांच्यासारखे सर्पमित्र केवळ साप पकडण्याचे काम करत नाहीत, तर नागरिकांमध्ये सर्पाविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्पसंवर्धन आणि मानवी-सर्प गैरसमज याबाबत जनजागृती करण्याचेही महत्त्वाचे काम करतात. विषारी साप घरात किंवा मानवी वस्तीजवळ आढळल्यास स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित सर्पमित्र किंवा संबंधित वनविभागाशी संपर्क साधणे हा सुरक्षित पर्याय आहे.
श्री. गावडे यांनी आतापर्यंत सहा हजारांपेक्षा जास्त वन्यप्राण्यांना रेस्क्यू करून त्यांच्या अधिवासात सुरक्षितपणे सोडण्याचे काम केले आहे. अनेक वर्षे ते सातत्याने करत आहेत. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोल्हापूर रेस्क्यू टीम सोबतही काम केले आहे.
जैवविविधतेच्या अभ्यासासाठी महत्त्वाची नोंद
सिंधुदुर्गातील समृद्ध जैवविविधतेतून समोर आलेली ही दुर्मीळ नोंद सापांविषयी भीती नव्हे, तर कुतूहल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारी ठरावी. साप निसर्गातील महत्त्वाचा घटक आहेत; त्यांचे संरक्षण म्हणजेच आपल्या परिसंस्थेचे संरक्षण होय.
कुडाळ वनक्षेत्रपाल चेतन पाटील व वनपाल श्री. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्मीळ सापाचे रेस्क्यू करण्यात आले. याबाबत प्राणी अभ्यासक डॉ. योगेश कोळी यांनी सांगितले की, सापांच्या रंगांमध्ये नेहमीच नैसर्गिक विविधता आढळून येते.
अल्बिनिझम ही आनुवंशिक रंगद्रव्याच्या कमतरतेशी संबंधित अवस्था आहे. यामध्ये त्वचा, शरीरावरील रंग आणि डोळ्यांतील रंगद्रव्य मोठ्या प्रमाणात कमी किंवा अनुपस्थित असू शकते. अल्बिनो आणि ल्युसिस्टिक साप यांच्यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे.
ल्युसिझममध्ये शरीराचा रंग मोठ्या प्रमाणात फिका किंवा पांढरा असला तरी डोळ्यांमध्ये सामान्य रंगद्रव्य टिकून राहू शकते; तर पूर्ण अल्बिनिझममध्ये डोळ्यांमध्येही रंगद्रव्याचा अभाव दिसतो. म्हणूनच अल्बिनो मध्ये प्राण्यांच्या डोळ्यांचा रंग, शरीररचना आणि इतर ओळख वैशिष्ट्यांच्या आधारे नोंद करणे वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, असे मत प्राणी अभ्यासक डॉ. योगेश कोळी यांनी व्यक्त केले.