

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत समाधानकारक पाऊस झाला असला, तरी सप्टेंबर महिन्यात पावसाने मोठी दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या पाच दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. यामुळे अनेक ठिकाणी भरड शेतातील पाण्याची पातळी कमी होऊन जमीन कोरडी पडू लागल्याने भातशेती पिवळी पडू लागली आहे.
कुडाळ तालुक्यात दरवर्षी साधारणपणे ३ हजार मिमीच्या आसपास पाऊस पडतो. त्यामुळे यंदा आतापर्यंत झालेला पाऊस आणि पुढील काळातील पावसाची स्थिती पाहता यावर्षी तालुका नेहमीची सरासरी गाठणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गतवर्षाच्या तुलनेतही यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने आगामी पंधरवड्यात तालुक्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
मात्र यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाचे चित्र संमिश्र होते. जून महिन्यात तालुक्यात ५०३ मिमी पाऊस झाला. मात्र, जूनमध्ये तब्बल १४ दिवस पावसाची नोंद शून्य होती. जुलै महिन्यात पावसाने जोर पकडला. या महिन्यात ७६२ मिमी पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे जुलै महिन्यात एकही दिवस पूर्ण कोरडा गेला नाही.
ऑगस्टमध्येही पावसाची सातत्यपूर्ण हजेरी राहिली असून ५७२ मिमी पाऊस झाला. ऑगस्टमध्येही शून्य पावसाची नोंद असलेला दिवस नव्हता. अशा प्रकारे जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत मिळून १८३७ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये पावसाचा वेग अचानक मंदावल्याने पावसाच्या एकूण हंगामाच्या आकडेवारीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाची परिस्थिती अत्यंत निराशाजनक राहिली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत केवळ ३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १ सप्टेंबरला ७ मिमी, २ सप्टेंबरला ६ मिमी, ३ सप्टेंबरला २.५ मिमी, ४ सप्टेंबरला १२.५ मिमी, ५ सप्टेंबरला शून्य, ६ सप्टेंबरला ३ मिमी, ७ सप्टेंबरला ४ मिमी आणि ८ सप्टेंबरला २.२ मिमी पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप घेतली असून ११ ते १५ सप्टेंबर असे सलग पाच दिवस कोरडे गेले आहेत. सप्टेंबरमध्ये पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने परिस्थितीत बदल झाला आहे. अनेक ठिकाणी शेतातील पाणी कमी होऊ लागले असून, जमिनीतील ओलावाही घटत आहे.
तालुक्यात दरवर्षी सुमारे ३ हजार मिमीच्या आसपास पाऊस पडतो. यंदा जून ते ऑगस्टअखेरपर्यंत १८३७ मिमी पाऊस झाला आहे. त्यात सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातील केवळ ३७ मिमीची भर पडली आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा अद्याप सरासरीच्या खाली आहे.
उर्वरित पावसाळी कालावधीत दमदार पाऊस झाला, तर सरासरीच्या जवळ पोहोचणे शक्य होईल; अन्यथा यंदाची पावसाची सरासरी गतवर्षाच्या तुलनेतही कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या उत्तरार्धात पाऊस किती बरसतो, यावरच यंदाच्या पावसाळ्याचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, सध्या मात्र पावसाची उघडीप शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.
भातशेती सध्या वाढीच्या तसेच दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहे. याच कालावधीत पावसाने उघडीप घेतल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे. सध्या रोपे लवकरच प्रसवण्याच्या स्थितीत आहेत. या काळात शेतातील ओलावा टिकून राहणे महत्त्वाचे आहे. पावसाची उघडीप आणखी लांबल्यास हलक्या भात पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.