Nilesh Rane : कुडाळ २१ व्या शतकातील शहर बनविण्याचा प्रयत्न!

आ. नीलेश राणे; सुशोभीत गणेश घाट परिसराचे लोकार्पण
Nilesh Rane
कुडाळ : गणेश घाट व परिसर सुशोभीकरण लोकार्पणप्रसंगी कोनशीला अनावरण करताना आ. नीलेश राणे. सोबत दत्ता सामंत, प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, खंडू पवळ व लोकप्रतिनिधी. (छाया : काशिराम गायकवाड)
Published on
Updated on

कुडाळ : तुम्ही मला जिंकवलंय, आता माझा मतदारसंघाला मला जिंकवायचाय. महाराष्ट्राच्या नकाशावर कुडाळ-मालवण मतदारसंघ मागे राहू नये, ही तळमळ आहे. मागील दहा वर्षांत जे घडलं नाही, ते घडवण्याचा आपण प्रयत्न करतोय. मला यातून काहीही मिळवायचं नाही; तर या मतदारसंघात मोठमोठी विकास कामे करायची आहेत. कुडाळ शहरात गणेश घाट व परिसर सुशोभिकरण प्रकल्पाचे लोकार्पण झाले आहे. कुडाळ हे २१ व्या शतकातील जागतिक दर्जाचे सुंदर शहर बनविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन आ.नीलेश राणे यांनी केले. यावेळी त्यांनी विकासकामांबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना श्रेयवादावरून विरोधकांवरही निशाणा साधला.

कुडाळ नगरपंचायत आणि पर्यटन संचालनालय यांच्या माध्यमातून शहरातील भंगसाळ नदी किनारी बांधलेल्या सार्व. गणेश घाट व परिसर सुशोभिकरण लोकार्पण सोहळा सोमवारी आ. नीलेश राणे यांच्या हस्ते झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्ष सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, जि.प.उपाध्यक्ष दादा साईल, सभापती मिलिंद नाईक, मुख्याधिकारी खंडू पवळ, प्रसाद रेगे, काका कुडाळकर, संजय पडते, जि. प. सदस्य दीपलक्ष्मी पडते, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, व्यापारी संघटना तालुकाध्यक्ष पी.डी.शिरसाट, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली व विनायक राणे, सत्ताधारी नगरसेवक, शिवसेना-भाजपा पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

आ. राणे म्हणाले, हा गणेश घाट व परिसर सुशोभिकरण होत असताना, अनेक गोष्टींचा फाॅलोअप, पाठपुरावा करावा लागला. आणि मग मीडियाच्या माध्यमातून इकडून तिकडून अनेक बातम्या या घाटासंदर्भात मांडण्यात आल्या. मी आमदार झाल्यानंतर या कामाच्या मंजुरी मिळवली. त्यानंतर कामाची निविदा, वर्क ऑर्डर, भूमिपूजन झालेे. मी कधीही श्रेयवादात जात नाही. मी जेव्हा आमदार नव्हतो, तेव्हाही मी सहकाऱ्यांना सांगायचो, दुसऱ्याच्या कामाचे श्रेय आपण कधीही घ्यायचे नाही. कारण त्यात आपली किंमत राहत नाही. श्रेयवादात न अडकता माझा मतदार संघ मला सर्वश्रेष्ठ बनवायचा आहे. मी आयुष्यात सर्व काही मिळवल आहे. माझ्या घरात मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री झाले, आज पालकमंत्रीही आहेत, अगोदरही झाले. मी खासदार होतो, आज आमदार आहे, हे सर्व काही मिळवण्यासाठी नाही. तर २०२४ मधील निवडणूकीत या मतदाराने आणि संपूर्ण जिल्ह्याने आमच्या कुटुंबासाठी जे उपकार केलेत, त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी मी धडपड करतोय.

मी जनतेला गृहीत धरणारा माणूस नाही. जो काम करेल तोच टिकेल, म्हणूनच मी काम करण्यासाठी इकडे उभा आहे. अनेक वेळेस खोट बोललं गेल की लोकांना ते खरं वाटायला लागते. तुम्ही पूर्वी या मतदारसंघाचे आमदार होता, पण लोकांनी तुम्हाला घरी का बसवलं? याची कारणं तुम्ही स्वतःहून शोधली पाहिजे, अशी नाव न घेता त्यांनी माजी आ. वैभव नाईक यांच्यावर टीका केली.

मी महाभारतातील शकुनी प्रमाणे प्रतिशोध घेणारा नाही. माझं चांगल झालं नाही मग मी कोणाचेच चांगले होऊ देणार नाही, अशी भूमिका घेणारे शकुनी या मतदारसंघात, जिल्ह्यात होता कामा नयेत. आमचेही पराभव झाले, आम्ही दोन वेळा हरलो, राणे साहेब दोन वेळा हरले पण कधी त्याचा राग आम्ही जनतेवर काढला नाही. शकुनी हा नकारात्मक वृत्तीचा होता. म्हणून हे सगळ महाभारत घडल. परंतू शेवटी पांडवच जिंकले हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणी कितीही नकारात्मक असला तरी त्याचा कोणताही परिणाम या कुडाळच्या विकासावर होणार नाही. असेही आ.राणेंनी ठणकावून सांगितले.

कुडाळ शहरात आगामी काळात मोठ्या विकासकामांचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. मच्छिंद्रनाथ कांबळी सभागृह, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शहरातील मुख्य डीपीआर रस्ता यासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घ्यायचे आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी आ. राणे यांनी न. पं. मुख्याधिकाऱ्यांनाही काही निर्देश दिले. उर्वरित दिवसात जे काही प्रकल्प राहिलेत ते पूर्ण करण्यासाठी भर द्या. एसटीपी प्लांट, पाणी पुरवठा प्रकल्प, अशा पाच ते आठ कामे आहेत, त्या कामांची यादी मला इम्प्लीमेंट करून पाहिजे, जसे गणेश घाटाची रिबीन उघडली तशी उर्वरित सर्व कामांची रिबीन उघडून लोकार्पण करण्यासाठी कामाला सुरुवात करा अशी सूचना त्यांनी न.पं. प्रशासनाला केली. दत्ता सामंत, दादा साईल यांनीही मनोगत व्यक्त केले.

मुख्याधिकारी खंडू पवळ यांनी प्रास्ताविकात शहरातील विकासकामे व योजनांचा आढावा घेतला. हा प्रकल्प पूर्ण करणारे ठेकेदार एस.के.पवार व गणेश म्हाडदळकर तसेच पर्यटन संचालनालयाचे उपअभियंता ऋषिकेश नारकर, न.पं.चे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आ.राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत व सत्कार नगराध्यक्ष बांदेकर-शिरवलकर आणि उपनगराध्यक्ष शिंदे यांनी केला. सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले.

आजचा दिवस हा आनंदाचा व ऐतिहासिक दिवस आहे. शहरवासीयांची गेल्या अनेक वर्षांची गणेश घाटाची मागणी पूर्ण होत असून प्रत्यक्षात गणेश घाट व परिसर सुशोभिकरणाचे लोकार्पण होत आहे. ही फक्त मागणीच नव्हे तर हा प्रकल्प श्रद्धेचा, भावनेचा, सन्मानाचा हा सोहळा आहे. शहरवासियांना अभिमान वाटेल असा हा प्रकल्प व्हावा, अशी आमची भूमिका होती. श्रेय घेण्यासाठी अनेक जण असतात; परंतु काम पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा होणे महत्त्वाचे असते. हा गणेश घाट केवळ गणेश मूर्ती विसर्जनासाठी नव्हे तर इतर दिवशीही निसर्ग सौंदर्यात भर टाकणारा हा प्रकल्प ठरणार आहे. गणेश घाटा समोर स्वागत कमानी, बैठक व्यवस्था, कारंजा, परिसर सुशोभिकरण अशा अनेक गोष्टींचा यात समावेश आहे. या ठिकाणी न. पं. मार्फत सुरक्षा पथकही तैनात ठेवण्यात येणार आहे. शहराला विकासनिधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खा. नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे व आ. नीलेश राणे यांचे आम्ही आभारी आहोत.
- प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगराध्यक्षा- कुडाळ न. पं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news