

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी गोदाघाट परिसरात प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसर पुढील १५ ते २० दिवस भाविकांसाठी बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आले असून, या कालावधीत दशक्रिया विधी वगळता अन्य धार्मिक विधी पर्यायी ठिकाणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे रामकुंडावर धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची तारीख जवळ येत असल्याने गोदाघाटावरील कामांना वेग देण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह व मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सोमवारी (दि. १२) संयुक्त पत्रकार परिषद घेत सोहळ्याच्या अनुषंगाने रामकुंड परिसर आवश्यक तयारी, व्यवस्था आणि अन्य संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी हा परिसर काही काळ टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.
तसेच या भागातील भाविकांची गर्दी आणि धार्मिक विधींचे नियोजन लक्षात घेऊन, प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रामकुंड हे धार्मिक विधीसाठी महत्त्वाचे स्थान असल्यामुळे परिसर बंद ठेवण्याच्या कालावधीत सुरक्षितता, व्यावसायिक आणि भाविकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दशक्रिया विधी सुरू ठेवून अन्य धार्मिक विधींसाठी पर्यायी ठिकाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली वाढल्या असल्या, तरी परिसर बंद ठेवण्याचा कालावधी, पर्यायी जागा आणि भाविकांच्याू सूचनांबाबत स्पष्ट नियोजन जाहीर होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन:
ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीदरम्यान काही कामांमुळे नागरिकांना तात्पुरता त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र, ही कामे भाविकांच्या सुविधा आणि शहराच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, नाशिक शहर स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा. असे आवाहन यावेळी महापालिका व कुंभमेळा प्राधिकरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
"गोदाघाट परिसरातील बांधकामे, फरसबंदी, कॉंक्रिटिकरण आणि अन्य आवश्यक कामे योजना-नुसार पूर्ण करण्यात येणार आहेत. भाविकांसाठी शौचालयासारख्या मूलभूत सुविधा कार्यान्वित करण्याबरोबरच परिसरातील स्वच्छता आणि व्यवस्थापनाची कामेही प्राधान्याने केली जात आहेत. मनपाच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत आहे."— मनीषा खत्री, आयुक्त,
"नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ महा-कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा हा सर्व नाशिककर नागरिकांचा सोहळा आहे. या सोहळ्यानिमित्त नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दोन्ही ठिकाणच्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये सर्व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा."
— शेखर सिंह, आयुक्त, नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण