ई-चलन मधील पळवाटा बंद होणार, राज्यभरात कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्याचा प्रश्न

ई-चलन मधील पळवाटा बंद होणार, राज्यभरात कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्याचा प्रश्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर ई-चलनमार्फत कारवाई केली जाते. मात्र, चालकांकडून दंड थकीत राहत असल्याने राज्यभरात कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्याचा प्रश्न प्रशासनासमोर आहे. थकीत दंड वसूल करण्यासाठी प्रत्येक वाहनधारकास विमा काढण्यापूर्वी, पीयूसी आणि वाहन परवाना नूतनीकरण व वाहन विक्री पूर्वी थकीत दंड भरणे बंधनकारक करण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांच्या विचाराधीन आहे.

बेशिस्तरीत्या वाहने चालविणाऱ्यांसह वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिस, महामार्ग पोलिस ई-चलन तसेच स्पीडगनद्वारे यंत्रणा दंड करीत आहेत. राज्यभरात ही प्रक्रिया सुरू असून, नियम मोडणाऱ्या चालकांना ई-चलनमार्फत दंड ठोठावला जात आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल झाला असला तरी बहुतांश चालकांनी दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केली आहे. लोकअदालतीतही चालकांकडून यास सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र राज्यभरात आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा दंड आजही थकीत आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना ई-चलनद्वारे केलेला दंड वसूल करणे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वारंवार आवाहन करूनही चालक दंड भरत नसल्याने त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच महामार्ग पोलिसांनी यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. प्रत्येकवर्षी वाहनचालकांना विमा नूतनीकरण बंधनकारक असते. त्यावेळी विमा कंपन्यांनी अगोदर संबंधित वाहनचालकास ई-चलनचा दंड असल्यास तो भरण्याची सक्ती करावी, दंड भरल्याची पावती जोडल्यानंतरच विमा प्रक्रिया पूर्ण होईल, असा निर्णय महामार्ग पोलिसांनी निर्णय घेतला आहे. यासह प्रादेशिक परिवहन विभागासोबतही चर्चा सुरू आहे. पीयूसी काढताना, वाहनचालक परवाना नूतनीकरण आणि वाहन विक्री करताना थकीत दंड वसूल केल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यास सुचवले आहे. त्यामुळे ई-चलन भरण्यापासून पळ काढणाऱ्यांची पळवाट बंद होणार आहे.

 नाशिकमध्ये लाखहून अधिक चालकांना नोटिसा

नाशिकमध्ये सन २०२२ च्या अखेरीस शहरात १२ कोटी ९३ लाख १७ लाख ९५० रुपयांचा ई-चलन अंतर्गत दंड थकीत होता. तर, जिल्ह्यात एक कोटी ९८ लाख ४३ हजार चारशे रुपयांचा दंड थकीत होता. त्यापैकी मोजकीच दंडवसुली झाली आहे. तर, नाशिक जिल्ह्यातील लोकअदालतीमध्ये सहभागी होऊन दंड भरण्यासाठी एक लाख ४३ हजार वाहनचालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आतहे.

राज्यात हजारो वाहन चालकांचे ई-चलन थकीत आहे. पोलिसांनी विचारणा केल्यावर ठरवीक चालकच दंड भरतात. त्यामुळे विमा व पीयूसी काढतेवेळी, वाहन विक्री करताना, परवाना नूतनीकरणावेळी दंड भरल्यानंतरच प्रक्रिया करण्यासंदर्भात निर्णय विचाराधीन आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणांशी चर्चा सुरू आहे.

– डॉ. रवींद्र सिंगल, अपर पोलिस महासंचालक, महामार्ग पोलिस

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news