

नाशिक : पुढारी टीम
इंदिरानगर बोगद्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढाकार घेतला असून, बोगद्याला समांतर दुसरा बोगदा तयार करण्याचे प्रस्तावित असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यासाठी प्राधिकरणाकडून पाठपुरावा करण्यात आल्यामुळे वर्षभरापूर्वीच बोगद्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून, केंद्राकडून 30 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आल्याचे महामार्ग प्रशासनाकडून सांगण्यात आले. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने सोमवारी (दि. 23) ‘मनस्तापाचा बोगदा’ या मथळ्याखाली ग्राउंड रिपोर्ट प्रसिद्ध करत समस्येला वाचा फोडली होती. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
महामार्ग प्राधिकरणाकडून मुंबई नाक्याच्या बाजूने बोगद्याजवळ 5 मीटर अंतरावर 20 मीटर रुंदीचा दुसरा समांतर बोगदा तयार करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे या दुसर्या बोगद्यातून वाहने इंदिरानगरकडे जाऊ शकतील. महामार्ग प्राधिकरणाच्या प्रस्तावानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या बोगद्याची लांबी 20 मीटर आहे. मनोहर गार्डन किंवा पाथर्डी फाट्याकडून इंदिरानगरकडे जाणाऱ्या वाहनाला उड्डापुलाशेजारील रस्त्यावरून मुंबई नाक्याकडे डाटामॅट्रिक्स पॉइंटपर्यंत सुमारे 300 मीटर जाऊन उड्डाणपुलाखालून वळसा घालून पुन्हा बोगद्यापर्यंत यावे लागते.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढाकार घेतला असून, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी समांतर 7 मीटरचे दोन रॅम्प (छोटे पूल) तयार करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे मुंबई नाक्याकडून आणि पाथर्डी फाट्याकडून येणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
रॅम्प तयार केल्यामुळे पाथर्डी फाट्याकडून आलेली आणि मनोहर गार्डनकडून आलेली वाहने रॅम्पवरून मुंबई नाक्याजवळ उतरतील, तर मुंबई नाक्याकडून आलेली वाहने रॅम्पवर चढतील. मुंबईच्या दिशेने जाताना बोगद्याच्या पुढे जाऊन रॅम्पवरून खाली उतरतील अन महामार्गाच्या दिशेने जातील.
उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी 7 मीटरचे रॅम्प तयार करण्यात येणार असल्याने बोगद्याची रुंदी 34 मीटर होणे अपेक्षित आहे. उड्डाणपुलाच्या खाली दोन समांतर बोगदे तयार झाल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या बोगद्यातून शहरातील इंदिरानगरकडून येणारी वाहने मनोहर गार्डनकडे किंवा मुंबई नाक्याच्या दिशेने सर्व्हिस रोडने पुढे जातील तसेच मनोहर गार्डन किंवा पाथर्डी फाट्याच्या दिशेने आलेल्या वाहनांना समांतर दुसऱ्या बोगद्यातून इंदिरानगरकडे जाता येईल यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.
सध्याच्या बोगद्याला समांतर बोगदा तयार करताना शहरातील वाहतुकीचेही नियोजन करावे लागणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नाशिक पोलिसांशी चर्चा सुरू आहे. नियोजित बोगदा आणि रॅम्पचे काम सुरू असताना उड्डाणपुलावरील वाहतूक थांबवून ती सर्व्हिस रोडने सोडावी लागणार आहे. यासाठी नाशिक पोलिसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच शासनस्तरावरुन नोटिफिकेशन जारी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बोगद्याला समांतर दुसरा बोगदा तयार करताना उड्डाणपुलाला मोठे भगदाड पाडावे लागेल. उड्डाणपुलाची उंची 30 मीटर असल्याने खड्डे करण्यासाठी किमान 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, यावर उपाय म्हणून बॉक्स पुशिंग टेक्नॉलॉजीचा वापर केल्यास 7 दिवसांत बोगद्यासाठी खड्डा तयार होऊ शकतो. मात्र हे काम खर्चिक होऊ शकते. यासाठी केंद्राची, राज्य शासनाची परवानगी तसेच स्थानिक यंत्रणांना समन्वयाने काम करावे लागेल. बॉक्स पुशिंग मशीनद्वारे डाव्या बाजूने उड्डाणपुलाला भगदाड पाडण्यास सुरुवात केल्यास दुसऱ्या बाजूने मशीनच्या आकारात माती बाहेर निघेल. त्यामुळे काम जलदगतीने होण्यास मदत होईल.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढाकार घेतला असून, बोगद्याला समांतर दुसरा बोगदा तयार करण्याचे प्रस्तावित असूनही नाशिक पोलिस, महानगरपालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे बोगद्याचे काम वर्षभरापासून रखडले आहे. बोगद्याच्या कामाचा श्रीगणेशा कधी होणार याबाबत निश्चिती नसले, तरी सिंहस्थपर्व सुरू होईपर्यंत काम पूर्ण केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असले, तरी या तिन्ही यंत्रणातील समन्वयाअभावी या कामाला खिळ बसत असल्याचे दिसत आहे.
इंदिरानगर बोगद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बोगद्याशेजारी दुसरा समांतर बोगदा तयार करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यासाठी प्राधिकरणाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. सिंहस्थ पर्वकाल सुरू होण्याअगोदर बोगद्याचे काम होणे अपेक्षित आहे.
दिलीप पाटील, मॅनेजर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नाशिक.