

कराड : पुढारी वृत्तसेवा
शिक्षण मंडळ संचलित कराड येथील महिला महाविद्यालयात सार्वजनिक चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून, गेल्या वर्षभरापासून या प्रयोगशाळेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जात आहेत. नागरिक, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक, शेतकरी तसेच संशोधक विद्यार्थ्यांना या सुविधेचा मोठा लाभ होत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ यांनी दिली.
यावेळी प्रा. डॉ. शंकर हजारे, प्रा. डॉ. अखिलेश शिंदे आणि प्रा. डॉ. विलास सुर्वे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बल्लाळ म्हणाले, महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाण्याची शुद्धता तपासण्यापासून ते अन्नपदार्थ, दूध, माती आणि हवेच्या गुणवत्तेच्या परीक्षणापर्यंत विविध चाचण्या केल्या जातात. निवासी सोसायट्या, कार्यालये, शाळा-महाविद्यालये, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, विहिरी, नळ तसेच जलतरण तलावातील पाण्याचे नमुने तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे.
पाण्याच्या गुणवत्तेबाबत खात्री करून घेण्यासाठी या चाचण्यांचा उपयोग होतो. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची परीक्षण करताना ग्रेव्ही, तसेच जिवाणूंच्या चाचण्यांचा समावेश आहे. रोगकारक जंतूंची ओळख आणि आवश्यक सूक्ष्मजीवविषयक तपासण्यासाठीही प्रयोगशाळेत सुविधा उपलब्ध आहेत.
दुधातील एकूण चरबीचे प्रमाण, मॅस्टायटिस चाचणी, एनएमबीआरटी चाचणी आणि दुधातील भेसळ तपासणी अशा विविध चाचण्या येथे केल्या जातात. त्यामुळे दूध आणि अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यासाठी संबंधितांना स्थानिक पातळीवर सुविधा मिळत आहे. महाविद्यालयात संशोधन करणाऱ्या पीएचडी विद्यार्थ्यांसाठी यूव्ही स्पेक्ट्रोफोटोमीटरसारख्या उपकरणांवर आधारित चाचण्या उपलब्ध आहेत.
तसेच मायक्रोबायोलॉजिकल टेस्टिंगसह विविध संशोधनात्मक चाचण्या करण्याची सुविधाही सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात एवढ्या विविध प्रकारच्या चाचण्या एकाच ठिकाणी उपलब्ध होणे ही कराडसाठी अभिमानाची बाब असल्याचे डॉ. बल्लाळ यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांसाठी माती व कृषी नमुन्यांचे विश्लेषण:
शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही ही प्रयोगशाळा उपयुक्त ठरत आहे. माती व कृषी नमुन्यांचे विश्लेषण करताना सूक्ष्म अन्नद्रव्ये, जडधातू, विशिष्ट गुरुत्व, ओलाव्याचे प्रमाण, सेंद्रिय कार्बन, सामू (पीएच), विद्युत चालकता, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, बायकार्बोनेट आणि क्लोराइड यांसारख्या घटकांची तपासणी केली जाते. तसेच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम (एनपीके) या प्रमुख अन्नद्रव्यांचे विश्लेषण करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण:
हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण हीदेखील प्रयोगशाळेची महत्त्वाची सुविधा आहे. रुग्णालयामधील अंतर्गत हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण, अन्न उद्योगांसाठी इनडोअर एअर संप्पलिंग आणि औषधनिर्मिती उद्योगांमधील हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण केले जाते. विविध उद्योग आणि संस्थांना आवश्यक असलेल्या हवेच्या नमुन्यांचे परीक्षण करता येते.