

बीड: विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांचा मुलगा सौरभ सोनवणे याला अडकवण्यासाठी वाल्मीक कराड यांनी कारागृहातून कट रचल्याचा आरोप केला होता. तसेच या आरोपाच्या समर्थनार्थ खासदार सोनवणे यांनी कथित संभाषणाची ऑडिओ क्लिपही पत्रकार परिषदेत ऐकवली होती. या क्लिपमध्ये संभाषण करणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणून आरोप झालेल्या सुग्रीव कराड यांनी आता या संपूर्ण प्रकरणावर खुलासा केला आहे. संबंधित ऑडिओ क्लिप खोटी असून AIच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचा दावा सुग्रीव कराड यांनी केला आहे.
खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलीविरुद्ध आणि आपल्या पत्नीविरुद्ध केज नगरपंचायतीच्या एकाच प्रभागातून निवडणूक झाली होती. त्यावेळी आपल्या पत्नीने खासदार सोनवणे यांच्या मुलीचा पराभव केला. याच कारणामुळे खासदार सोनवणे यांच्या मनात आपल्याविषयी राग असल्याचा दावा सुग्रीव कराड यांनी केला आहे.
‘या रागातूनच मला वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वीदेखील दोन-तीन वेळा मला वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला असून, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत,’ असा दावा कराड यांनी केला.
तसेच आपल्यावर राजकारणातून बाजूला होण्यासाठी दबाव आणण्यात आला होता. मात्र आपण मागे न हटल्याने आपल्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. आगामी नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपली राजकीय प्रतिमा खराब करून राजकारणातून संपवण्याचा हा डाव असल्याचे सुग्रीव कराड यांनी म्हटले आहे.
टोलनाक्यावरील व्हिडीओवरही कराड यांचा खुलासा
दरम्यान, गेल्या काही दिवसांत सुग्रीव कराड यांचा केज तालुक्यातील उमरी टोलनाक्यावरील एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला होता. या व्हिडीओमध्ये ते टोलनाका कर्मचाऱ्यांशी वाद घालताना आणि शिवीगाळ करताना दिसत होते.
याबाबतही कराड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘देशमुख हे माझे मित्र आहेत. माझ्या फास्टटॅग मधील पैसे संपले होते. त्यामुळे मी त्यांना विनंती करत होतो. मात्र त्यांनी माझे म्हणणे ऐकले नाही. त्यातून टोलनाका कर्मचाऱ्यांशी वाद झाला आणि त्यांनी माझ्याविरोधात तक्रार दिली,’ असे कराड यांनी सांगितले. त्यानंतर पोलीस ठाणे तसेच न्यायालयात जाऊन हा वाद मिटवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.