

Delhi Aizawl Flight Medical Emergency
छत्रपती संभाजीनगर : दिल्लीहून आइजोलकडे जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 291 या विमानात प्रवासादरम्यान एका प्रवाशाची अचानक प्रकृती गंभीर झाली. या आपत्कालीन परिस्थितीत माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा डॉक्टर डॉ. भागवत कराड यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढाकार घेत संबंधित प्रवाशाला वैद्यकीय मदत केली.
मिझोरमच्या दौऱ्यासाठी दिल्लीहून आइजोलकडे विमानाने प्रवास करत असताना एका प्रवाशाची अचानक प्रकृती खालावली. त्याला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच डॉ. भागवत कराड यांनी डॉक्टर म्हणून पुढे येत संबंधित प्रवाशाची तपासणी केली.
विमानातील उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा वापर करून प्रवाशाला आवश्यक प्राथमिक उपचार करण्यात आले. श्वसनास त्रास होत असल्याने त्याला ऑक्सिजन देण्यात आला. विमानातील कर्मचाऱ्यांनीही डॉ. कराड यांना सहकार्य केले. प्रवाशाची प्रकृती लक्षात घेऊन विमान आइजोल येथे पोहोचल्यानंतर पुढील उपचारांची व्यवस्था करण्यात आली.
विमानतळावर आगमन होताच संबंधित प्रवाशाला ऑक्सिजनच्या सुविधेसह तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर पुढील उपचार सुरू करण्यात आले.
विमान प्रवासादरम्यान घडलेल्या या प्रसंगात वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्याने संबंधित प्रवाशाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविणे शक्य झाले. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून प्रवाशाला मदतीचा हात देणाऱ्या डॉ. कराड यांच्या तत्परतेची ही घटना ठरली.