

Proposal for a bond of Rs 400 crores for Simhastha submitted to the government
नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी उपलब्धीकरिता करिता महापालिकेच्या माध्यमातून २०० कोटी ग्रीन बॉण्ड, तर २०० कोटी म्युनिसिपल बॉण्ड (रोखे) उभारण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाने शासनाच्या नगरविकास विभागाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. शासन मंजुरीनंतर या ४०० कोटींच्या बॉण्ड उभारणीच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल.
नाशिकमध्ये येत्या २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्यासाठी सुमारे पाच लाख साधू-महंत व १० कोटी भाविक येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. यात साधू-महंत व भाविकांना सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी नाशिक महापालिकेवर आहे. त्यासाठी महापालिकेने १५ हजार कोटी रुपये खर्चाचा सिंहस्थ आराखडा शासनाला सादर केला आहे.
सिंहस्थासाठी आता दोन वषपिक्षा कमी कालावधी उरला असताना केंद्र व राज्य शासनाकडून सिंहस्थ कामांसाठी भरीव निधी प्राप्त झालेला नाही. राज्य विधिमंडळाच्या गत पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली. त्यानुसार सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने सिंहस्थ कामांचे नियोजन केले आहे. मात्र, हा निधी पुरेसा नसल्यामुळे सिंहस्थासाठी महापालिकेच्या हिश्श्याची रक्कम उभी करण्यासाठी २०० कोटींचे ग्रीन बॉण्ड व २०० कोटी म्युनिसिपल बॉण्डद्वारे निधी उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी शासनाची मंजुरी आवश्यक असल्याने महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाने नगरविकास विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील दोन महिन्यांत बॉण्ड उभारणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
बॉण्ड उभारणीसाठी बँकर, कायदेशीर सल्लागार, सनदी लेखापाल आदींची नेमणूक महापालिकेला करावी लागणार आहे. सद्यस्थितीत बँकर म्हणून स्थायी समितीच्या मान्यतेने ए. के. कॅपिटल या वित्तीय संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. बॉण्ड उभारणीच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची मान्यता घेतली जाणार आहे.