Nashik Municipal Corporation Recruitment medical staff news
नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळा डोळ्यासमोर असताना नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचा कारभार मात्र 'रामभरोसे' सुरू असल्याचे चित्र आहे. वैद्यकीय विभागातील ९३४ पदांपैकी जेमतेम ३२९ पदेच कार्यरत असून, रिक्त पदांची संख्या ६०५ वर पोहोचली आहे. यामध्ये डॉक्टरांच्या मंजूर १८९ पदांपैकी केवळ ४७कार्यरत असून, १४२ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. कायम नोकरभरतीला शासनाकडून मंजुरी मिळत नसल्याने मानधनावर या पदांची भरती करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय विभागाने आयुक्तांना सादर केला आहे.
नाशिक महापालिकेच्या माध्यमातून शहरात पाच मोठ्या रुग्णालयांसह ३० शहरी आरोग्य केंद्रे चालविले जातात. त्याचप्रमाणे नव्याने ७९ आरोग्यवर्धिनी केंद्रे तसेच १४ ठिकाणी आपला दवाखाने चालविले जात आहेत. शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर आरोग्य सेवेवर ताण वाढत चालला असताना महापालिकेतील वैद्यकीय विभागातील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस घटत चालली आहे.
कोरोनाकाळात वैद्यकीय विभागातील नोकरभरतीला शासनाने मान्यता दिली होती. परंतु मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने ही प्रक्रियाच रद्द केली गेली. सद्यस्थितीत विशेष तज्ज्ञांसह डॉक्टरांची एकूण १८९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ४७डॉक्टर कार्यरत असून, तब्बल १४२ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ४६३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेची रुग्णालये चालवायची कशी, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ही पदे मानधनावर भरण्याचा प्रस्ताव वैद्यकीय विभागाने आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर केला आहे.
वैद्यकीय विभागाच्या आस्थापनेवर ९३४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६०५ पदे रिक्त आहेत. यात विशेष तज्ज्ञांसह डॉक्टरांची १४२ पदे रिक्त आहेत. त्यात फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलज्ज्ञ, सर्जन, अस्थिव्यंग तज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ, नेत्रशल्य चिकित्सक अशा महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. महापालिकेकडून ही तज्ज्ञ पदे भरण्यासाठी वारंवार जाहिराती काढल्या जातात. परंतु, तज्ज्ञ डॉक्टर महापालिकेकडे फिरकत नसल्यामुळे महापालिकेने मानधनात मोठी वाढ केली आहे. तरीही वैद्यकीय विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा असल्याचे चित्र आहे.