Nashik News : कारागृहातील स्मृतिकक्ष जपतोय ‘श्यामची आई’च्या राष्ट्रीय गौरवाच्या आठवणी

नाशिकरोड बंदीगृहातील साने गुरुजींची खोली जपतेय साहित्य, संस्कार आणि मानवतेचा वारसा
Nashik News : कारागृहातील स्मृतिकक्ष जपतोय ‘श्यामची आई’च्या राष्ट्रीय गौरवाच्या आठवणी
Published on: 
Updated on: 

अंजली राऊत

नाशिक : मातृत्वाची महती, संस्कारांचे मोल आणि माणुसकीचा धर्म सांगणाऱ्या ‘श्यामची आई’ या अजरामर साहित्यकृतीचा जन्म नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात झाला. स्वातंत्र्यलढ्यातील सहभागामुळे कारावास भोगणाऱ्या साने गुरुजींनी याच कारागृहातील एका कक्षात अवघ्या पाच दिवसांत या पुस्तकाचे लेखन पूर्ण केले. आजही हा ‘स्मृतिकक्ष’ त्यांच्या साहित्यिक प्रतिभेची, मातृप्रेमाच्या उदात्त भावनेची आणि मानवतावादी विचारांची साक्ष देत उभा आहे. कारागृहाच्या भिंतीआड जन्मलेली ही साहित्यकृती आजही समाजमनावर संस्कार करत आहे. ‘श्यामची आई’ या चित्रपटाला १० ऑक्टोबर १९५४ रोजी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्यानिमित्ताने साने गुरुजींचा ‘स्मृतिकक्ष’ बंदिवानांसाठी आत्मपरीक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा ठरत आहे.

पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी हे केवळ साहित्यिक नव्हते, तर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, शिक्षक आणि संवेदनशील विचारवंत होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना कारावासाची शिक्षा सुनावली. कारागृहातील प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी लेखणीची साथ सोडली नाही. उलट, त्याच वातावरणात त्यांच्या साहित्याला नवे आयाम मिळाले. साने गुरुजी स्मृतिकक्षात एकूण १० स्वतंत्र कोठड्या असून प्रत्येक कोठडीचा आकार ११ × ८ फूट आहे. हा स्मृतिकक्ष त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची जिवंत साक्ष देतो.

Nashik News : कारागृहातील स्मृतिकक्ष जपतोय ‘श्यामची आई’च्या राष्ट्रीय गौरवाच्या आठवणी
PM Narendra Modi Photo | नाशिकच्या दुय्यम निबंधक कार्यालयात महापुरुषांच्या रांगेत मोदींचा मोठा फोटो! मनविसे आक्रमक

या लेखनप्रक्रियेच्या उपलब्ध नोंदीनुसार, गुरुजींनी एकूण ४५ रात्रींचे लेखन केले होते. त्यापैकी तीन रात्री वगळून ४२ रात्रींच्या कथांचा समावेश पुस्तकात करण्यात आला. पुढे या पुस्तकाने मराठी साहित्याच्या सीमा ओलांडत अनेक पिढ्यांच्या मनात स्थान मिळवले. १६ फेब्रुवारी १९३६ रोजी प्रकाशित झालेल्या पहिल्या आवृत्तीपासून सुरू झालेला या पुस्तकाचा प्रवास आजही प्रेरणादायी ठरत आहे.

कारागृह हे सामान्यतः बंधने, शिक्षा आणि एकाकीपणाचे प्रतीक मानले जाते; मात्र साने गुरुजींच्या बाबतीत याच जागेने साहित्यनिर्मितीचा इतिहास घडवला. त्यामुळे नाशिकरोड कारागृहातील हा स्मृतिकक्ष केवळ ऐतिहासिक वास्तू नसून, प्रतिकूल परिस्थितीतही विचारांची ज्योत तेवत ठेवण्याची जाणीव करून देणारे प्रेरणास्थळ ठरत आहे.

नाशिकरोड कारागृहातील हा स्मृतिकक्ष भूतकाळाची आठवण करून देतानाच वर्तमानाला प्रश्न विचारतो: ‘माणसाला बदलण्याची संधी आपण देतो आहोत का?’ साने गुरुजींच्या साहित्याचा आणि विचारांचा वारसा या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच हा कक्ष केवळ स्मारक नसून साहित्य, संस्कार आणि माणुसकीच्या संगमातून घडणाऱ्या परिवर्तनाचे केंद्र आहे.

Nashik News : कारागृहातील स्मृतिकक्ष जपतोय ‘श्यामची आई’च्या राष्ट्रीय गौरवाच्या आठवणी
Girish Mahajan Nashik | नाशिकच्या अंबडमध्ये रासायनिक पाण्याने नागरिकांच्या अंगावर चट्टे! पालकमंत्री गिरीश महाजन अ‍ॅक्शन मोडमध्ये

‘श्यामची आई’ने लाखो वाचकांच्या मनात आईविषयी कृतज्ञता आणि जीवनाविषयी संवेदनशीलता निर्माण केली. त्याच पुस्तकाच्या जन्मस्थानी आजही माणसाला माणूस म्हणून समजून घेण्याचा संदेश दिला जातो. कारागृहाच्या भिंतीआड उमललेले हे शब्दविश्व काळाच्या सीमा ओलांडून आजही सांगते, की ‘परिस्थिती माणसाला बंदिस्त करू शकते; मात्र विचार, प्रेम आणि संस्कार यांना कधीच कैद करू शकत नाही.’

Nashik News : कारागृहातील स्मृतिकक्ष जपतोय ‘श्यामची आई’च्या राष्ट्रीय गौरवाच्या आठवणी
Divyang School Recruitment Scam| नाशिक, धुळे अन् जळगावात दिव्यांग शाळांमध्ये बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उघडकीस!

पाच दिवसांत शब्दबद्ध झाले मातृप्रेमाचे विश्व

साने गुरुजींच्या साहित्यविश्वात अढळ स्थान असलेल्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे लेखन ९ फेब्रुवारी १९३३ च्या रात्री सुरू झाले आणि १३ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत चालले. या पाच दिवसांत त्यांनी आईच्या आठवणी, बालपणीचे अनुभव, संस्कारांचे महत्त्व आणि जीवनमूल्ये यांना शब्दरूप दिले. पुस्तकातील प्रत्येक प्रसंगातून आईच्या प्रेमाची ऊब, तिच्या शिकवणीची ताकद आणि मुलाच्या मनावर होणारे संस्कार यांचे दर्शन घडते.

कारागृहाच्या भिंतीआड साहित्यसाधना

स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय असलेल्या साने गुरुजींना ब्रिटिश राजवटीत अनेकदा कारावास भोगावा लागला. धुळे कारागृहात असताना विनोबा भावे यांनी भगवद्गीतेच्या १८ अध्यायांवर दिलेली प्रवचने त्यांनी लिहून घेतली. याच नोंदींमधून पुढे ‘गीता प्रवचने’ या ग्रंथाची निर्मिती झाली. नाशिक कारागृहातील वास्तव्यातही त्यांची साहित्यसाधना सुरूच राहिली. ‘धडपडणारी मुले’, ‘पुनर्जन्म’ आणि अन्य साहित्याशी संबंधित त्यांच्या कारावासातील अनुभवांचा उल्लेख त्यांच्या जीवनचरित्रात आढळतो.

स्मारक नव्हे, परिवर्तनाचा विचार

‘श्यामची आई’चे महत्त्व केवळ एका पुस्तकापुरते मर्यादित नाही. मातृत्वाच्या माध्यमातून संस्कार, त्याग, प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्यांची शिकवण देणारी ही साहित्यकृती आजही घराघरांत वाचली जाते. या पुस्तकाचा जन्म ज्या खोलीत झाला, त्या जागेचे जतन करणे म्हणजे मराठी साहित्याच्या इतिहासाबरोबरच मानवी मूल्यांचा वारसा जपणे होय.

Nashik News : कारागृहातील स्मृतिकक्ष जपतोय ‘श्यामची आई’च्या राष्ट्रीय गौरवाच्या आठवणी
Maharashtra Police Vacancies | महाराष्ट्र पोलिसांवर 23 हजार पदांचा अतिरिक्त ताण! 10 टक्के पदे रिकामी असल्याने खाकीवर वाढला भार

‘श्यामची आई’ चित्रपटाला राष्ट्रपती सुवर्णपदक

आचार्य प्र. के. अत्रे दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपटाला १० ऑक्टोबर १९५४ रोजी पहिल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सर्वोच्च सन्मान (राष्ट्रपती सुवर्णपदक) मिळाला.

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने साने गुरुजींच्या वास्तव्याशी संबंधित स्मृतिकक्ष जतन करून ठेवला आहे. या जागेचा इतिहास बंदिवानांना सांगताना केवळ एका महान साहित्यिकाच्या आठवणी जागवल्या जात नाहीत, तर जीवनाकडे नव्याने पाहण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाते. आयुष्यातील चुका किंवा गुन्ह्यांमुळे शिक्षा भोगणारी व्यक्ती ही समाजाचाच एक भाग असते. तिचे पुनर्वसन, मानसिक परिवर्तन आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनरागमन घडवून आणणे, हा कारागृह व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे.

— अरुणा अर्जुनराव मुगुटराव, अधीक्षक, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news