

नाशिक : शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने शहर वाहतूक शाखेच्या संयुक्त सहभागाने कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली. यात चार लाख 30 हजार रुपयांच्या चोरीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. सिद्धांत किशन सपकाळे (21, रा. समतानगर, टाकळी) याला ताब्यात घेण्यात आले.
सोमवारी (दि. 5) दुपारी 2 च्या सुमारास नाशिकरोड गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना होंडा क्टिव्हा दुचाकीवरील नंबर प्लेटमध्ये छेडछाड केल्याचे निदर्शनास आले. संशयिताने तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने पथकाने सतर्कता दाखवत तांत्रिक ॲपच्या साहाय्याने तपास केला असता, नंबर चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांना पाहताच संशयित बिटको सिग्नलमार्गे पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करतहवालदार प्रकाश पवार, वाल्मीक मुंढे, भाऊसाहेब कुटे यांच्याशी संपर्क साधून एबीबी सर्कल परिसरात संशयिताला अडवले.
पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीचे नाव सिद्धांत किशन सपकाळे (21, रा. समतानगर, टाकळी, नाशिक) असे असून तो रेकॉर्डवरील दुचाकीचोर असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे असलेल्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणांहून चोरल्या होत्या. ही कामगिरी नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील हवालदार विशाल पाटील, सागर आहणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे ,योगेश रानडे यांनी केली.