

देवळाली कॅम्प : मध्य रेल्वेच्या 11 कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. यामध्ये भुसावळ विभागातील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुंबईत महाव्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. त्यांच्या सतर्कतेमुळे दोन संभाव्य अपघात टळले आणि प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले.
कर्तव्यादरम्यान कर्मचाऱ्यांनी दाखविलेली सतर्कता, अनपेक्षित घटनांना आळा घालण्यात केलेल्या योगदानाबद्दल हे पुरस्कार देण्यात आले. पुरस्कारामध्ये पदक, प्रशस्तिपत्र, उत्कृष्ट सुरक्षा कार्याची उल्लेखपत्रिका तसेच साडेतीन हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे.
भुसावळ विभागाचे सहायक लोको पायलट एच. के. वर्मा हे दिनांक 16 डिसेंबर 2025 ला भुवनेश्वर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसवर कर्तव्यावर असताना, नियमित तपासणीदरम्यान त्यांना चाक क्रमांक 5 जवळील प्रायमरी हेलिकल स्प्रिंग तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या सतर्कतेमुळे व बारकाईने निरीक्षण केल्यामुळे संभाव्य अपघात टळला.
शेगाव येथील ट्रॅक मेंटेनर किशोर निकम यांनी 15 डिसेंबर 2025 ला रात्री 1.10 वाजता केलेल्या तपासणीदरम्यान रेल्वेमार्गावरील फिशप्लेट खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ रुळाचे संरक्षण करून संबंधित सर्वांना माहिती दिल्याने अपघात टळला.
सरिता मोरेंमुळे प्रवाशाला जीवदान
नाशिकरोडला हेड कॉन्स्टेबल सरिता मोरे 29 नोव्हेंबरला नाशिकरोड स्थानकावर कर्तव्यावर असताना, स्थानकातून सुटत असलेल्या राजधानी एक्स्प्रेसच्या बी-4 कोचमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना एक प्रवासी खाली पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली व त्या प्रवाशाला इजा होण्यापासून वाचवले. त्यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे प्राण वाचले.