

नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये आले असून, संपूर्ण प्रक्रियेवर ‘तिसऱ्या डोळ्या’ची करडी नजर असणार आहे. पारदर्शकता राखण्यासाठी शहरातील 88 मतदान बूथवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, 70 संवेदनशील केंद्रांचे थेट ‘वेबकास्टिंग’ केले जाणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी तब्बल 600 गुन्हेगारांना शहरातून हद्दपार (तडीपार) केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक निरीक्षक नतिशा माथूर यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. महेशकुमार डोईफोडे आणि उपायुक्त नितीन गाढवे प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त नितीन गाढवे यांनी सादरीकरणाद्वारे तयारीचा आढावा मांडला. उमेदवारांना चिन्ह वाटप, मतपत्रिकांची छपाई, ईव्हीएम मशिनची सज्जता, ‘स्ट्राँग रूम’ची कडेकोट व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदारांच्या सोयीसाठी ‘एक खिडकी’ कक्ष आणि तक्रार निवारण केंद्रही कार्यान्वित करण्यात आले आहे.
मुख्य निवडणूक निरीक्षक नतिशा माथूर यांनी ईव्हीएम तयार करताना आणि सील करताना विशेष दक्षता घेण्याचे आदेश दिले. मतदानाच्या दिवशी मतदारांना पाणी, सावली यांसारख्या मूलभूत सुविधांची कमतरता भासणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, पैशांचा किंवा दारूचा वापर रोखण्यासाठी महामार्गावरील नाक्यांवर कडक वाहन तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
परदानशीन केंद्रांसाठी विशेष व्यवस्था
शहरात 247 मतदान केंद्रे ही परदानशीन आहेत. या केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या महिलांची ओळख पटवण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था केली असून, तिथे अतिरिक्त महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी स्पष्ट केले.
अशी आहे पोलिसांची कारवाई
हद्दपार : 600 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती.
वॉरंट : 330 जणांना अजामीनपात्र वॉरंट बजावले.
अवैध शस्त्रे : 7 जणांवर गुन्हे दाखल.
बंदोबस्त : 21 संवेदनशील केंद्रांवर राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात.
नियंत्रण कक्ष : पोलिस मुख्यालयात 24 तास कंट्रोल रूम सुरू.