

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास सुरू असून, त्याचा फटका स्वच्छतेसह पर्यावरण आणि पशुधनालाही बसत आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे शहरातील अनेक गटारी तुंबल्या असून, ओवाडी नाल्यातही मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. प्लास्टिकबंदी अंमलबजावणीसाठी महापालिकेकडून केली जाणारी कारवाई केवळ नावापुरती ठरत असल्यामुळे काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा 'जैसे थे' होत आहे.
शहरातील प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर थांबवण्यासाठी कठोर कारवाईसह व्यापक जनजागृती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरातील जुन्या आग्रा रस्त्यावरील ओवाडी नाला परिसरात प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. शहरात पुरेसा कचराकुंडी नसणे आणि घंटागाड्या वेळेत येत नसल्यामुळे नागरिकांकडून रस्त्यांच्या कडेला, मुख्य चौकांत तसेच गटारींमध्ये कचरा टाकला जातो.
परिणामी, गटारी तुंबून असवच्छतेची समस्या निर्माण होत आहे. विविध बाजारपेठांमध्ये किरकोळ वस्तूंच्या विक्रीसाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे शहरातील प्लास्टिकबंदी प्रभावीपणे राबवली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्यावर, रस्त्याच्या टाकलेला प्लास्टिक कचरा खाल्ल्यामुळे शेळ्या आणि गायींच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. प्लास्टिकमुळे जनावरांची पचनक्रिया हळूहळू बंद पडू शकते. गंभीर परिस्थितीत शस्त्रक्रिया करावी लागते. उपचार करूनही जनावरांच्या मृत्यूचा धोका कायम राहतो. त्यामुळे पशुपालकांना नाइलाजाने आपली जनावरे विकावी लागत असल्याचे चित्र आहे.
शहरातील विविध भागांत दररोज भरणाऱ्या बाजारांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या बाजारपेठांत विक्रेते आणि ग्राहकांमध्ये पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर वाढवण्यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
प्लास्टिक पिशव्या खाल्ल्याने शेळ्या आणि गायींची पचनक्रिया हळूहळू बंद पडते. अशा प्रकरणांमध्ये गंभीर स्थिती निर्माण झाल्यास शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय ठरतो. त्यामुळे जनावरांच्या मृत्यूचा धोका वाढतो आणि पशुपालकांना नाइलाजाने जनावरे विकावी लागतात.
- डॉ. जावीद खातीक, पशुधन विकास अधिकारी.