मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयाने दोन स्वतंत्र खून खटल्यांमध्ये महत्त्वपूर्ण निकाल देत दोन्ही प्रकरणातील मुख्य आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मनमाड येथे पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला व डोंगराळे येथील यात्रेत अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
याच प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला बाललैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. मनमाड येथे ११ जानेवारी २०२१ रोजी ही घटना घडली होती. रमेश दशरथ जाधव (३५, रा. वेळापूर, जि. सोलापूर) याने दारूच्या नशेत पत्नी फुलाबाई (३२) हिला कमरेच्या पट्ट्याने व लाकडी काठीने मारहाण केली.
तोंड फर्शीवर आपटल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाल्याने मनमाड शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक वैभव महाइंगिरे, पी. बी. गिते व ई. एम. मिसे यांनी तपास करून मालेगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. भोसले यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अशोक पगारे यांनी आठ साक्षीदार तपासून युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपी रमेश जाधव याला दोषी ठरवत जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.
डोंगराळे यात्रेतील हत्याप्रकरणी जन्मठेप: दुसरी घटना ९ ऑक्टोबर २०२२ रोजी डोंगराळे येथील जैतोबा महाराज यात्रेत घडली होती.
जळगाव जिल्ह्यातील दहिगाव-मोहाडी येथील अर्जुन धनसिंग ठाकरे (१९) हा नातेवाईकांसह यात्रेसाठी आला होता. यात्रेत अल्पवयीन मुलीशी आरोपी गोकुळ आहिरे याने गैरवर्तन केले. मुलीने नातेवाईकांना हा प्रकार सांगितल्यानंतर आरोपीकडे जाब विचारला. यावेळी गौरव दादाभाई हदप याने बुटाात लपवलेला चाकू काढून फिर्यादीवर वार केला. अर्जुन ठाकरे हा मध्यस्थी करण्यासाठी गेला असता आरोपीने त्याच्या मंदीवर चाकूने वार केला. उपचारदरम्यान अर्जुनचा मृत्यू झाला.
याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. मालेगाव येथील विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. संजय सोनवणे व ॲड. एम. एस. फुलपगारे यांनी १६ साक्षीदार तपासले.
ॲड. सोनवणे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने गौरव हदप याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने स्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर गोकुळ आहिरे याला पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास ठोठावला. दंडाची एकूण ३५ हजार रुपयांची रक्कम मृत अर्जुनच्या वडिलांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.