

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक असलेल्या भाताची पावसाअभावी डोळ्यांदेखत राख होत असून, अस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा हतबल झाला आहे. रोजगाराच्या मर्यादित संधी आणि खरबडीत जमिनीवरील पावसावर आधारित खरीपातील भातरूपी जीवनाधार दुष्काळाने हिरावला आहे.
गेल्या तीन वर्षांचे सरासरी पर्जन्यमान म्हणजे तालुक्याचा पाऊस या गृहीतकाचा आधार घेत शासनाने यंदा तालुक्यात ११२ टक्के पाऊस झाला व सर्व काही आलबेल असल्याचा निष्कर्ष काढला आहे. प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत विदारक आहे. त्यातही तालुक्याचे शासन आणि प्रशासन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात व्यस्त आहे. त्र्यंबकेश्वर येथे येणारे प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी आणि सरकारमधील मंत्री यांच्या स्वागतासाठी संपूर्ण यंत्रणा दिमतीला वाहिली आहे.
त्यातही त्र्यंबकेश्वर येथे कोणाचा दौरा नसेल तर नाशिक वा मुंबई येथे बैठका असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पाहण्यास कोणालाही वेळ नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यात यंदा १६ हजार हेक्टरवर भातपिकाची लागवड झाली आहे. त्यासाठी बी-बियाणे, खते, पेरणीपूर्व आणि आवणी व आवणीपूर्व मशागत यासह अगदी अलीकडे केलेली निंदणी या सर्वांचा एकत्रित खर्च हेक्टरी एक लाखाच्या आसपास होतो.
यामध्ये शेतकरी कुटुंबातील सदस्यांच्या मेहनताना आणि नांगरणी, वखरणी करताना लावलेले मोल विचारात घेतले आहे. तालुक्यात १६० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. हातउसने, उधारी, कर्ज यासह स्वतःची मजुरी या माध्यमातून झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने उत्पन्न कवडीमोलाचेही नाही. याचा विचार शासनपातळीवर गांभीर्याने होणे आवश्यक आहे. यासह नागली, वरई, उडीद आणि इतर पिकांना कमी पावसाचा फटका बसला आहे.
तालुक्याचा अलीकडच्या तीन वर्षांतील सरासरी पाऊस २१६६.१ मिमी इतका आहे.
पर्जन्यमानात घट:
त्र्यंबकेश्वर येथे पूर्वी दरवर्षी पावसाळ्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत १०० इंचापेक्षा जास्त पाऊस व्हायचा म्हणजेच २५०० मिमी आणि संपूर्ण चार महिन्यांत तो सुमारे १५० इंच म्हणजे ३७५० मिमीपेक्षा जास्त असायचा. दिवसेंदिवस पाऊसमान कमी होत गेले आणि आजच्या घडीला सरासरी पाऊस २१६६ मिमी म्हणजे अवघा ८६ इंच इतका गृहीत धरला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यंदाचा पाऊस अत्यल्प:
यंदा नोंदवलेला पाऊस २४३०.६ मिमी इतका झाला आहे. साहजिकच २६४.५ मिमी इतका पाऊस यंदा जास्त झाला आहे. यामध्ये तालुक्यातील सर्व मंडलात मिळून सरासरी काढली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आणि त्यातही ब्रह्मगिरीच्या परिसरात अवघा २३४६ मिमी पाऊस झाला आहे.