

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून नाशिक विभागात ३० मेअखेर तब्बल १७ हजार ९१० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. याशिवाय विविध आरक्षण आणि विशेष कोट्यांतर्गत १ हजार ६६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत.
कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमधील प्रवेशांचा यामध्ये समावेश आहे. विभागीय शिक्षण विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ७ हजार १९३ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश निश्चित केले आहेत.
त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यात ५ हजार ३२४, धुळे जिल्ह्यात ३ हजार २३० तर नंदुरबार जिल्ह्यात २ हजार १६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर पसंतीक्रम नोंदविण्यास सुरुवात केली.
विज्ञान शाखेला नेहमीप्रमाणे मोठी मागणी असली, तरी कला आणि वाणिज्य शाखांनाही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांमध्ये ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील मुदतींचे पालन करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करावी, असे आवाहन केले आहे.