

पणजी : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पक्षातील मतभेद दूर करून सर्व नेत्यांना एकत्र आणणे आणि आगामी निवडणुकीत भाजपला सत्तेबाहेर करणे हेच प्रमुख लक्ष्य असल्याचे स्पष्ट केले. २०२७मध्ये काँग्रेसची सत्ता आणायची आहे, असे सांगून चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा सोपविल्याबद्दल पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानले आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याचे सांगितले.
चोडणकर यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. चोडणकर म्हणाले की, 'तामिळनाडूमधील काँग्रेसच्या चांगल्या कामगिरीमुळे पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविला आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देता संघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्षाला निवडणुकीसाठी सज्ज करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील.
निवडणुका जवळ आल्यामुळे पक्षासमोर मोठी आव्हाने उभी आहेत, मात्र कार्यकर्ते आणि नेत्यांच्या सहकार्याने ही आव्हाने पेलू' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप सरकारवर टीका करताना चोडणकर म्हणाले की, गेल्या १५ वर्षांत विकासाच्या नावाखाली राज्याचे मोठे नुकसान भाजपने केले आहे. राज्यातील नैसर्गिक संसाधने, जमीन आणि सार्वजनिक हिताच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे.
भाजप सरकारने राज्याला विक्रीस काढल्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. आगामी निवडणुकीत हा मुद्दा जनतेसमोर प्रभावीपणे मांडला जाईल. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व समविचारी पक्ष आणि घटकांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे, दरम्यान, काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी चोडणकर यांना पक्षाचा झेंडा भेट देत प्रभार सोपवला आणिशुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकारी अध्यक्ष एम के शेख कार्ल्स फेरेरा, ऑल्टन डिकोस्टा खजिनदार दत्ता नाईक यांचेही स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
आघाडीबाबत आम्ही सकारात्मक : माणिकराव ठाकरे ठाकरे
म्हणाले की, निवडणुकीच्या दृष्टीने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यातील काहीजण परदेशात आहेत, ते आल्यावर सर्वांचा असाच एकत्रित कार्यक्रम केला जाईल. सत्ताधारी पक्षातील नाराज आमदार काँग्रेसकडे आले, तर या प्रश्नाला सध्या उत्तर नाही. कारण प्रत्येक मतदारसंघात आमचे स्ट्रॉग उमेदवार आहेत. मित्र पक्षाच्या आघाडीबाबत आम्ही सकारात्मक आहोत, मात्र त्यांना काय वाटते, हेही महत्त्वाचे आहे. भाजपला हरवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे, त्यासाठी आमचे प्रयत्न असतील, मात्र, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असेही ठाकरे म्हणाले.
समाजासाठी काहीतरी चांगले 66 करण्यासाठी सर्वकाही सोडून राजकारणात आलो. मीही माणूस असून थोडा भावनिक होणारच, पण गोव्याच्या भल्यासाठी लढा यापुढेही सुरू राहील. प्रदेशाध्यक्षपद नसल्याने माझ्या कुडचडे मतदारसंघावर पूर्ण लक्ष देता येईल.
- अमित पाटकर, माजी प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस