

नाशिक रोड : मध्य रेल्वेच्या ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहिमेला मोठे यश मिळत आहे. या मोहिमेंतर्गत कौटुंबिक वाद, किरकोळ कारणावरून घरातून पळून जाऊ पाहणाऱ्या 414 लहान मुलांना पुन्हा त्यांच्या कुटुंबाकडे सुखरूप हवाली करण्यात आले. ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 या तीन महिन्यात वाट चुकलेल्या 414 मुलांना कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले.
काही मुले भांडण, कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या, शहराच्या ग्लॅमरच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता नाशिक रोड आदी रेल्वे स्थानकावर येतात. तेथून रेल्वेने मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाऊ पाहतात. रेल्वे स्थानकावर बावरलेली, भुकेलेली, थंडीत कुडकुडत रडवेली झालेली अशी मुले, मुली रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि नन्हे फरिश्तेचे स्वयंसेवक हेरतात. हे प्रशिक्षित कर्मचारी विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मुलांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना पालकांकडे पुन्हा जाण्यासाठी प्रबोधन करतात.
मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) रेल्वे स्थानकात चोवीस तास गस्त घालतात. या दलाकडे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली. याशिवाय ते कुटुंबियांशी किरकोळ वादातून घरातून दुसऱ्या शहरात पळून जाऊ पाहणाऱ्या मुलांच्या सुटकेसाठी मोहिम राबवतात. त्यासाठी ऑपरेशन नन्हे फरिश्तेतंर्गत अन्य स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली जाते. १ ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर 2024 या कालावधीत या दलाने एकूण 414 मुलांना (306 मुले आणि 108 मुली) त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले.
ऑगस्ट - 2024 मध्ये 97 मुलगे आणि 44 मुली - एकूण 141 मुले
सप्टेंबर - 2024 मध्ये 125 मुलगे आणि 35 मुली - एकूण 160 मुले
ऑक्टोबर - 2024 मध्ये 84 मुलगे आणि 29 मुली - एकूण 113 मुले
एकूण मुलगे – 306
एकूण मुली – 108
एकूण मुले - 414