

मध्य रेल्वेच्या 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते'तंर्गत रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) सात महिन्यांत हरविलेल्या ८६१ बालकांची पालकांशी पुर्नभेट घडवून आणली आहे. आरपीएफने खऱ्याअर्थाने या बालकांना सुखरुप घरी पोहोचवत त्यांचे बालपण जपले. या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. (Nanhe Farishte Operation by RPF)
बालवयामध्ये घरातील पालकांसमवेत भांडण झालेले, कौटुंबिक समस्या तसेच शहरातील ग्लॅमरच्या शोधात घर सोडलेली बालके विविध रेल्वे किंवा रेल्वे स्थानकांवर आढळून येतात. अजाणत्या वयात हातून घडलेली चूक न उमगता येणाऱ्या बालकांसाठी मध्य रेल्वेची आरपीएफ टीम देवदूत बनली आहे. रेल्वे अथवा स्थानकांवर आढळणाऱ्या या मुलांशी आरपीएफचे प्रशिक्षित कर्मचारी संवाद साधतात. यावेळी बालकांच्या समस्या जाणून घेतानाच या बालकांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते'च्या माध्यमातून आरपीएफने हरविलेल्या ८६१ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. त्यामध्ये ५८९ मुले तसेच २७२ मुलींचा समावेश आहे.
रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) खांद्यावर रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र व प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ते सुटका केलेल्या मुलांसाठी रेल्वे मंत्रालयाच्या कार्यप्रणालीद्वारे हरविलेल्या बालकांची त्यांच्या पालकांशी पुर्नभेट घडवून आणण्याचे कार्य करत आहेत. माणुसकीच्या नात्याने आरपीएफ जवान पार पाडत असलेल्या या उदात्त सेवेबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.
आरपीएफ अलीकडेच म्हणजे ७ नोव्हेंबरला रेल्वेस्थानकावर सुमित नावाचा हरविलेला मुलगा आढळला. अधिकाऱ्यांनी त्याचे समुपदेशन केले. यावेळी त्याच्या उजव्या हातावर मोबाईल क्रमांकाचा टॅटू आढळून आला. आरपीएफ टीमने त्या नंबरवर संपर्क साधला असता त्याच्या भावाशी बोलणे झाले. सदर बालकाला स्मृतिभ्रंश असून तो गोष्टी विसरतो, अशी माहिती त्याच्या भावाकडून समजली. आरपीएफने चाईल्ड लाईनच्या मदतीने मुलाची वैद्यकीय तपासणी केली आहे. सुमितचा भाऊ त्याचा ताबा घेण्यासाठी येईपर्यंत त्याचे बालगृहात पुर्नवसन करण्यात आले.