

लासलगाव : बांगलादेश सरकारने भारतातून कांदा आयात करण्यासाठी नवीन आयात परवाने थांबवले आहेत. हा निर्णय खास करून हिली लँड पोर्ट या सीमावर्ती मार्गाद्वारे आयात होणाऱ्या कांद्याबद्दल लागू करण्यात आला आहे. सरकारने नव्या परवान्यांवर मंजुरी देणे बंद केले आहे. आधी मंजूर झालेल्या परवान्यांखालील आयात 30 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. नाशिक जिल्ह्यातून दररोज 50 ते 55 ट्रकमधून 1500 टन कांदा निर्यात होत आहे.
भारतातून बांगलादेशमध्ये होणारी निर्यात मंदावल्याने लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यात कांदादरात मोठी घसरण होत आहे. लासलगावसह देशातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांत लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असल्याने दरांवर तीव्र दबाव निर्माण झाला आहे. यासोबतच बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे भारतातून होणारी कांदा निर्यात मर्यादित प्रमाणातच सुरू आहे.
याचा भारतीय कांद्याच्या निर्यातीवरही प्रतिकूल परिणाम होत आहे. बांगलादेश सरकारने त्यांच्या कांदा उत्पादकांच्याच हितासाठी आणि स्थानिक बाजारात शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी कांदा आयातीवर निर्बंध लादले आहेत. पुरवठा आधीपासूनच सुरू असला तरी आता नवीन परवाने मिळणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 200 कोटींचा फटका
नाशिक जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत विविध बाजार समित्यांत झालेल्या सुमारे 20 लाख क्विंटल कांद्याच्या आवकेमुळे अंदाजे 175 ते 200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लाल कांद्याची मोठी आवक असताना बांगलादेशने नवीन आयात परवान्यांवर निर्बंध घातल्याने याचा फटका निर्यातीला बसू शकतो.
विकाससिंह, कांदा निर्यातदार, नाशिक
उत्पादन खर्च वाढलेला असताना कांद्याला अपेक्षित दर मिळत नाही. निर्यात मंदावल्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असून, सध्याचे दर तोट्याचे आहेत.
निवृत्ती न्याहारकर, शेतकरी, वाहेगाव