

दिंडोरी : नाशिक-पेठ या राष्ट्रीय महामार्गावरील आंबेगण शिवारात चाचडगाव टोलनाक्याजवळ नाशिककडून वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने पेठकडून येणाऱ्या इर्टिका कारला ओव्हरटेक करताना समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार, तर 6 जण जखमी झाले. जखमींतील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी (दि. 7) दुपारी तीनच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिल्व्हासा येथून इर्टिका कार (डीडी 01 एए 9013) ही पेठकडून नाशिककडे येत असताना नाशिककडून पेठकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओने (जीजे 15 सीआर 7964) चाचडगाव टोलनाक्याजवळ दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून धडक दिली. यात इर्टिकामधील 3 जण जागीच ठार झाले. यात शाहरुखखान फराकत खान (28, रा. सिल्व्हासा) जागीच ठार झाले. इतर दोघांची ओळख पटू शकली नाही.
स्कॉर्पिओमधील चोगिलाल हिरालाल गुजर (75, रा. देवगड, जि. राजस्थान) हे जागीच ठार झाले. जखमी किसनलाल हिरालाल गुजर (45), गणेशा किसनलाल गुजर (42), खुशी किसनलाल गुजर (12), पूनम गुजर (20, सर्व रा. राजगड, राजस्थान) यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनास्थळी दिंडोरीचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर, संजय गायकवाड, उपनिरीक्षक खुळे, उपनिरीक्षक दीपक दौडे यांनी धाव घेत वाहतूकसुरळीत केली.
डिव्हायडर बसवावेत
नाशिक-पेठ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरू असल्याने वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागते. चाचडगावपासून पुढे नेहमीच अपघात होतात. याकडे राष्ट्रीय महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची रुंदी वाढवत डिव्हायडर बसवावेत, अशी मागणी वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.