

लासलगाव (नाशिक) : राकेश बोरा
पाकिस्तान आणि चीनमधील स्पर्धात्मक किंमतींमुळे भारतीय कांदा निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेत आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आपल्या पेक्षा या दोन्ही राष्ट्रचा कांदा स्वस्त असल्याने भारतीय कांद्याची मागणी घटली आहे.
केंद्राकडून अनेकदा भारतीय कांदा निर्यातीवर अचानक पणे निर्बंध लावले जातात. त्यामुळे परकीय बाजारपेठेत आपली पत खालावली जात आहे.आंतरराष्ट्रीय खरेदीदारांना इतर देशांकडून कांदा खरेदी करण्याची सवय लागत असल्याने भारतीय कांद्याला फटका बसत असून निर्यात व्यवसायाला फटका बसत आहे.कांदा निर्यातीत घट होत असल्याने या घटकांशी संबंधित शेतकरी,व्यापारी,ट्रान्सपोर्ट व्यवसाय यांच्यावर परिणाम जाणवत आहे.
"पाकिस्तान श्रीलंकेला प्रति टन किंमत आणि मालवाहतूक (CNF) $170 ने देत आहे, तर भारतीय कांदा $330 CNF ने विक्री होत आहे. पाकिस्तान- सिंगापूर प्रति टन किंमत $२०५ ने देत आहे, तर भारतीय कांदा $३१५ CNF ने विक्री होत आहे. पाकिस्तान- मलेशिया प्रति टन किंमत $१७० ने देत आहे, तर भारतीय कांदा $२७० CNF ने विक्री होत आहे. त्यामुळे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळणारे कांद्याचे दर हे शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही. त्यात कांदा निर्यात अगदी संत दिशेने चालू आहे.यासाठी केंद्राने बांगलादेशने लादलेली आयात बंदी खुली करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे
विकास सिंह, कांदा निर्यातदार, लासलगाव, नाशिक
पाकिस्तान आणि चायना हे भारताच्या तुलनेत कमी दरात कांदा परकीय बाजारपेठेत देत असल्याने भारतीय कांद्याची मागणी कमी होत आहे. जागतिक बाजारात पाकिस्तानी नवीन कांद्याची आवक सुरूच आहे. पाकिस्तानी त्यांच्या कांद्याची गुणवत्ता सुधारत असून पुरवठ्यात सातत्य असल्याने पाकिस्तानी कांदा परकीय बाजारात त्यांचे स्थान मजबुत करत आहे. या व्यतिरिक्त, चिनी कांद्याची नवीन आवक $250 ला उपलब्ध आहे
भारतातील कांदा निर्यातीवर सरकारी हस्तक्षेपांचा परिणाम झाला आहे. १९ ऑगस्ट २०२३ रोजी ४० टक्के निर्यात शुल्क लादण्यात आले, नंतर ते $800 टन किमान निर्यात किंमत (MEP) ने बदलले आणि अखेर ८ डिसेंबर २०२३ पासून संपूर्ण बंदी घालण्यात आली. सरकार कडून स्थानिक बाजारपेठतील मागणी लक्षात घेता अनेकदा कांदा निर्यातीवर निर्बंध लावले जाते.
भारतातील कांद्याच्या किमतींवर वाढत्या देशांतर्गत उत्पादनामुळे कांदा दरावर दबाव दिसत आहे देशातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव मध्ये कांदा सरासरी १५०० रुपये प्रति क्विंटल ने विक्री होत आहे. यंदा देशात अतिरिक्त उत्पादनाचा अंदाज असल्याने कांदा निर्यातीसाठी नवनवीन बाजारपेठा शोधणे गरजेचे असल्याचे कांदा निर्यातदार बोलत आहे.