

Onion Farmers' dreams crushed
लासलगाव (नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील २०२४-२५ या हंगामात उन्हाळी कांद्याचे उत्पादन तब्बल ६३ टक्क्यांनी वाढ होऊन सुमारे ५९ लाख टनांवर पोहोचले आहे. मागील हंगामात (२०२३-२४) हे उत्पादन ३६ लाख टन होते. ही वाढ मुख्यतः लागवडीखालील क्षेत्रात वाढ आणि अनुकूल हवामान यामुळे झाल्याचे राज्य कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
या हंगामात २.५ लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली असून, प्रति हेक्टर सरासरी २३.४ टन उत्पादन नोंदवले गेले. मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे सुमारे १० टक्के पर्यंत नुकसान झाले असले, तरीही हंगाम भरघोस राहिल्याने ऑक्टोबरपर्यंत पुरेसा पुरवठा उपलब्ध राहणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मार्च ते एप्रिलमध्ये काढलेला उन्हाळी कांदा टिकाऊ असतो. तो सहा-सात महिने साठवता येतो, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत ठेवला आहे. पण एपीएमसीमध्ये भाव वाढतील याची वाट पाहताना काहीजण कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत.
सुनील गवळी, शेतकरी
उन्हाळी कांद्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची टिकाऊ गुणवत्ता ही कांदी ६ ते ७ महिने साठवून ठेवता येते, जी शेतकऱ्यांना बाजारात योग्य भाव मिळेपर्यंत थांबून विक्री करता येते. सध्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा घाऊक दर प्रतिक्विंटल १६०० रुपये आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १५०० रुपयांपेक्षा थोडा जास्त आहे. मात्र, उत्पादन खर्च आणि बाजारभावातील तफावत शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
केंद्र सरकारकडे प्रतिक्विंटल २००० रुपयांचे अनुदान देण्याची जोरदार मागणी केली आहे. तसेच केंद्र सरकारच्या किंमत स्थिरता निधी अंतर्गत ३ लाख टन कांद्याची खरेदी नाफेड व एनसीसीएफमार्फत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत, या संस्थांनी थेट एपीएमसीमध्ये ३,००० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करावी, अशी मागणीही केली आहे.
भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना
महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले की, "उत्पादन खर्च हा प्रतिक्विंटल सुमारे १८०० रुपये आहे, पण गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना १०५० ते १६०० रुपयांदरम्यानच दर मिळाला आहे. त्यामुळे सरसकट तोटा सहन करावा लागतो आहे. इतक्या मेहनतीने पिकवलेला कांदा उत्पादक खर्चापेक्षा कमी दराने विकावा लागत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहे. उन्हाळी कांद्याच्या विक्रमी उत्पादनामुळे जरी पुरवठा शाश्वत राहणार असला, तरी योग्य दर मिळत नसल्याने केंद्राने कांदा निर्यात वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आम्ही कांदा साठवून ठेवतोय, पण बाजारात १,२००-१,३०० पेक्षा भाव जात नाही. उत्पादन खर्च तरी भरून निघावा हीच आशा.
शेखर कदम, शेतकरी