

चांदवड : पुढारी वृत्तसेवा
मुंबई - आग्रा मार्गावरील राहुड घाटातील हनुमान मंदिराजवळ शुक्रवारी (दि. २८) रात्री ८.३० च्या सुमारास भरधाव कंटेनरने पुढे जाणारी कार, ट्रॅव्हल्स, पिकअप, पोलिस वाहन व आयशर अशा पाच वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
या अपघातात कंटेनरमधील क्लिनर रंगलाल रतन गुजर (रा. अजमेर, राजस्थान) यांचा मृत्यू झाला असून, सुमारे दहाजण जखमी झाले आहेत. अपघातांतर वाहतूक ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
रक्षाबंधनाच्या दिवशी महामार्गावर मोठी वर्दळ असताना राहूड घाटात टायर घेऊन जाणारा कंटेनर (आरजे ३६, सीए ८६१२) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे व वाहतुकीकडे दुर्लक्ष करून भरधाव नेला. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनरने पुढे जाणाऱ्या क्रेटा कार (एमएच ४१, बीआर ४२२५), ट्रॅव्हल्स (एमपी ०९, एजे ६८७०), पिकअप (एमएच १५, केएस ४११२), पोलिस वाहन (एमएच १५, एफव्ही ५०९१) व आयशर (यूपी ६५, जेटी ५९४५) या वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात कंटेनरमधील सर्व टायर महामार्गावर पडले. कारचा चुराडा झाला, तर पोलिस वाहनाचेही मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच चांदवड पोलिस, टोलचे आपत्कालीन कर्मचारी, १०८ रुग्णवाहिका, राहूड येथील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची रुग्णवाहिका यांनी जखमींना उपचारासाठी चांदवड व मालेगाव येथे तत्काळ हलविले.
अपघातात विशाल बावा, किरण बाळू बिरारी, बाबूलाल महारू साबळे, नवल देविदास आहेरे, अनिल भालचंद्र मोरे, आनंद सूर्यभान शेवाळे, यशवंत पंडित पवार, मयूर भास्कर वडनेरे, पिकअप वाहनचालक तसेच ट्रॅव्हल्समधील काळू दादजी निकम हे जखमी झाले.
घटनेबाबत जितेंद्र श्रीराम वाघ (४३, सरस्वती कॉलनी, मालेगाव) यांनी फिर्याद दिल्याने चांदवड पोलिसांत कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अरुण गंभीर, सुनील जाधव पुढील तपास करीत आहेत.