

uday samant no pressure but decision will favour mahayuti said uday samant
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
माघारीसाठी कुणावरही दबाव टाकलेला नाही. गोकुळ गितेंना मी विनंती केली आहे. ते माझ्या आणि गिरीश महाजन यांच्या विनंतीला मान देतील. त्यांनी आमच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा, एवढीच आमची भूमिका आहे, असे नमूद करत महायुतीला पोषक निर्णय होईल, असा विश्वास शिवसेने (शिंदे गट) चे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला आव्हान देणाऱ्या अपक्ष गोकुळ गिते आणि भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांच्या मनधरणीचे प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये तळ ठोकून असलेल्या मंत्री सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी ते म्हणाले की, गणेश गिते यांनी फॉर्म मागे घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन फॉर्म मागे घेतले. गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांचे फॉर्म अजून आहेत. प्रसाद हिरे यांच्याशी मी सकाळपासून दोनदा बोललो. दादा भुसे प्रसाद हिरे यांना भेटणार आहेत. गोकुळ गितेंना मी विनंती केली आहे. गिरीशभाऊ स्वतः जळगावहून नाशिकला आले आहेत. ते गणेश गिते आणि गोकुळ गिते यांना भेटतील. योग्य निर्णय होईल. आमचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचं समर्थन दोन्ही सहकारी उमेदवार करतील असा मला विश्वास आहे, असे सामंत म्हणाले.
महाजनांचे खच्चीकरण करायचे नाही
राजकारणात समज-गैरसमज होत असतात. ते वेळेवर दूर केले तर त्याचे परिणाम दूरगामी होत नाहीत. मी प्रचंड आशावादी आहे. मी आल्यावर फॉर्म मागे घेतला जाईल, असे कोणतेही चॅलेंज केलेले नाही. गिते बंधूंनी, आम्ही महाजन साहेबांचे ऐकतो, असे सांगितले. म्हणून मी महाजनांचे नाव वारंवार घेतले. यात मला गिरीश महाजनांचं खच्चीकरण करायचे नाही किंवा त्यांनाही माझे खच्चीकरण करायचे नाही. आम्ही दोघे महायुतीमधले मंत्री आहोत. यातून सुवर्णमध्य निघावा, महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने जिंकून यावा एवढीच आमची भूमिका आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
जर मी रेकॉर्डिंग ठेवले असते तर...?
कोणी कुठल्या उमेदवारावर दबाव आणू नये या मताशी मी सहमत आहे. मी रेकॉर्डिंग ठेवत नाही, मी जर गोकुळजींबरोबरच बोलतानाचे रेकॉर्डिंग ठेवले असते तर?, असा सवाल सामंत यांनी केला आहे. मी त्यांना सन्मानपूर्वक विनंती केली आहे. ते माझ्या आणि गिरीश महाजन यांच्या विनंतीला मान देतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.