

नाशिक : वीजबिल भरण्यास होणाऱ्या विलंबामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार कायम असलेल्या महापालिकेच्या शाळा इमारती आता सौरऊर्जेने झळाळणार आहेत.
नाशिक महापालिकेच्या सर्वच ७० शाळा इमारतींवर केंद्र शासनाच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जा (मेडा) आणि नाशिक महापालिकेच्या विद्युत, शिक्षण विभागामार्फत शाळा इमारतींचे संयुक्त सर्वेक्षण केले जाणार आहे.
नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ८८ प्राथमिक, तर १२ माध्यमिक शाळा चालविल्या जातात. ७० शाळा इमारतींमध्ये या शाळा भरतात. सुमारे ३२ हजार विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविला आहे.
खासगी शाळांच्या धर्तीवर महापालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल स्क्रीन, संगणक प्रयोगशाळा यासारख्या अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या या शाळांकरीता दरमहा सुमारे अडीच लाखांचे वीज देयक महापालिकेला भरावे लागते. देयक उशिरा भरल्यास वीज पुरवठा खंडीत होण्याचा धोकाही असतो. या संकटातून बाहेर पडण्यासाठी महापालिकेने पीएम सुर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत शाळा इमारतींमध्ये रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महाऊर्जा आणि महापालिकेच्या विद्युत व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत लवकरच संयुक्त सर्वेक्षण केले जाणार आहे. महापालिकेने यापूर्वी मुख्यालय राजीव गांधी भवनासह सहाही विभागीय कार्यालये, नाशिकरोड व नाशिक येथील जलतरण तलाव अशा ११ इमारतींवर रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविला आहे. त्याद्वारे वर्षाला लाखोंची वीजबचत होत आहे.
महापालिकेच्या एकूण प्राथमिक शाळा- ८८
महापालिकेच्या एकूण माध्यमिक शाळा- १२
महापालिकेच्या एकूण शाळा इमारती- ७०
महापालिकेच्या ७० शाळा इमारतींसाठी दरमहा सरासरी अडीच लाखांचे वीजबिल येते. त्यानुसार वार्षिक ३० लाखांचा खर्च या शाळांच्या वीजबिलापोटी होत आहे. शासनाच्या पीएम सूर्यघर वीज योजनेअंतर्गत या शाळा इमारतींमध्ये रूफ टॉप सोलर प्रकल्पाची उभारणी केल्यास महापालिकेच्या प्रतिवर्ष ३० लाखांची बचत होणार आहे.
शासनाच्या पीएम सूर्यघर वीज योजनेअंतर्गत महापालिकेची कार्यालये, शाळा इमारतींवर रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविण्याचे विचाराधीन आहे. यामुळे महापालिकेच्या वीज खर्चाची बचत होणार असून, शाळांनादेखील अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
अनिल गायकवाड, कार्यकारी अभियंता (विद्युत), महापालिका