

नाशिक : शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मलवाहिकांचे जाळे निर्मितीच्या २७५ कोटींच्या प्रकल्पाकरिता 200 कोटींचे हरित कर्जरोखे (ग्रीन बॉण्ड) उभारणीला महापालिकेच्या महासभेने हिरवा कंदील दाखविला.
हरित कर्जरोखे उभारणीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय बॉण्ड इश्यू कमिटी स्थापन केली जाणार असून, या समितीला महासभेने सर्वाधिकार प्रदान केले आहेत.
येथे २०२७मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थात येणाऱ्या लाखो साधू- महंत व कोट्यवधी भाविकांना महापालिकेच्या माध्यमातून विविध सोयी- सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने सिंहस्थ आराखडा तयार केला असून, सिंहस्थकाळात गोदावरी प्रदूषणमुक्त राहण्यासाठी मलनिस्सारण योजनेंतर्गत शहरात मलवाहिकांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. त्यासाठी २७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेसाठी हरित कर्जरोख्यांच्या माध्यमातून २०० कोटींची उभारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि त्याद्वारे अधिकृत केलेल्या प्रतिनिधींना सर्व व्यवहारांच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत केले जाणार आहे. यामध्ये ऑफर दस्तावेज, उपक्रम, करारासाठी बॉण्ड इश्यू कमिटीची स्थापना केली जाणार आहे. त्याचप्रमाणे कर्जरोखे उभारणीसाठी शासनाची मंजुरी मिळविणे, विविध टप्प्यांतील कामे, विविध शासकीय संस्थांची मंजुरी घेणे, कर्जासंबंधी कागदपत्रे तयार करणे यासाठी तसेच महापालिकेचे रेटिंग निश्चित करणे, यासाठी तज्ज्ञ सल्लागार संस्थेचीही नेमणूक केली जाणार आहे
हरित कर्जरोख्यांच्या उभारणीसाठी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, प्रकल्प संबंधित विभागप्रमुख, मुख्य लेखा परीक्षक अशी पाच सदस्यीय बॉण्ड इश्यू कमिटी स्थापन करण्यात आली आहे.
बॉण्डचे प्रमाण, वेळ आणि स्वरूप ठरविणे तसेच जारी करण्याच्या पद्धतीचा निर्णय घेण्याची जबाबदारी या बॅाण्ड कमिटीवर असणार आहे. यासंदर्भात पतधोरण एजन्सीज, विश्वस्त, कायदेशीर सल्लागार, ठेवीदार, स्टॉक एक्स्चेंज आदींसाठी किमान सदस्यता, ओव्हरस्क्रिप्शनची धारणा, मुदतवाढ यांसह मर्यादित नसलेल्या सर्व मध्यस्थ व एजन्सींची नियुक्ती, बॉण्ड इश्यू करणे आदी कार्य या कमिटीमार्फत केली जातील.