

नाशिक : महापालिकेच्या निवडणुका या जिल्हा परिषदेच्या निवडणुकानंतर होणार असले तरी प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम मात्र नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. याचाच एक भाग म्हणून 29 प्रभागांची चार सदस्य तर दोन प्रभागांची तीन सदस्य याप्रमाणे 31 प्रभागांची प्रारूप रचना मंगळवारी (दि.5) ऑगस्ट रोजी राज्याच्या नगर विकास विभागाला महापालिका प्रशासनाकडून पाठविली जाणार आहे. यात, प्रत्येक प्रभागाचे सीलबंद पाकिटे तयार करण्यात येणार असून त्यामध्ये नकाशा तसेच संभाव्य आकडेवारी आदी कागदपत्रे असणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे काम 11 जूनपासून सुरू होते. शासनाच्या आदेशानुसार सन २०१७ नुसार चार सदस्यीय प्रभागरचना आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रामध्ये ३१ प्रभाग असून लोकसंख्येचे गणित बसवताना २९ प्रभाग हे चार सदस्य असून प्रभाग क्रमांक १५ व १९ हे तीन सदस्य आहे. प्रभाग रचना अंतिम करण्याचा कार्यक्रम ११ जून ते ६ ऑक्टोबर असा असणार आहे.
नगर विकास खात्याच्या आदेशानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन पुन्हा सीमा निश्चिती, महामार्ग तसेच रस्त्यांच्या सीमा, तसेच अन्य हरकतींची तपासणी केली. ५ ऑगस्ट पर्यंत महापालिकेला स्थानिक स्तरावर प्रभागरचना करून नगरविकास विभागाला सादर करणे बंधनकारक असून त्यानंतर २८ ऑगस्टपर्यंत राज्य शासनाला प्रारूप प्रभाग रचना जाहीर करावी लागणार आहे. त्यानुसार निवडणूक विभागाने 31 प्रभागांचे बंद लिफाके तयार करून राज्य शासनाला पाठवण्याची तयारी पूर्ण केली आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाचे कर्मचारी खास दूत बनवून राज्याच्या नगर विकास विभागाकडे प्रभाग रचना तसेच संपूर्ण कागदपत्रे सादर करणार आहे.
पुढील 23 दिवसांमध्ये राज्याचा नगर विकास विभाग महापालिकेने पाठवलेल्या प्रभाग रचनेचा अभ्यास करून त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले आहे की नाही याची खात्री करणार आहे. त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार आहे. त्यानंतर हरकती सूचना व सुनावणी घेऊन ३ ते ६ ऑक्टोबर प्रभागरचना अंतिम केली जाणार आहे.
सर्वप्रथम जिल्हा परिषद निवडणुका होणार असून त्यानंतर नगरपंचायत व नगरपालिकेच्या निवडणुका होतील अखेरच्या टप्यात महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. यानंतर जानेवारी-फेब्रुवारीत नगरपंचायत, नगरपालिकेच्या निवडणुका होतील, असे बोलले जात आहे. यानंतर मार्च 2026 मध्ये महापालिकेच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे.