NMC News Nashik | मलनिस्सारण प्रकल्पासाठी 154 झाडे तोडणार
नाशिक : विकासकामांच्या आड सर्रास झाडांची कत्तल सुरू असल्याचे चित्र आहे. गंगापूर धरण थेट जलवाहिनीच्या कामासाठी १९८ झाडांची कत्तल केल्यानंतर आता आगरटाकळीतील मलनिस्सारण प्रकल्पासाठी १५४ झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाने मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवरील १५४ वृक्षासह अन्य पाच अशा १५९ वृक्षतोडीचा प्रस्ताव तयार केला असून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात नवीन वृक्षलागवड केली जाणार असल्याचा दावा उद्यान विभागाने केला आहे.
राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या 'हरित महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र' अभियानांतर्गत नाशिक महापालिकेला एक लाख वृक्षलागवडीचे उद्दीष्ट्य निश्चित करण्यात आले आहे. सोबतच महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत देखील अतिरीक्त २४ हजार ४८० वृक्ष लागवड अशी जवळपास सव्वा लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाने घेतले आहे. एकीकडे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागडीची मोहीम हाती घेतली असतांना, दुसरीकडे महापालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी मात्र सर्रास वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे चित्र आहे. गंगापूर थेट पाईपलाईन योजनेसाठी पहिल्या टप्प्यात शनैश्वर मंदिर चौक ते कृषीनगर जॉगींग ट्रॅक दरम्यानची ८३ झाडे तोडण्यात आली.
तर दुसऱ्या टप्प्यातील शंकर पाटील चौक ते मोतीवाला कॉलेज या दरम्यानची ६० झाडे आणि तिसऱ्या टप्प्यात ५५ झाडे तोडली जाणार आहेत. पाठोपाठ आता आगरटाकळी येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आगरटाकळी येथील सर्वे क्र.३७२/२ येथे मलजल शुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार असून त्या प्रकल्पासाठी १५४ झाडे तोडण्याचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीवर ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी प्रकल्प उभारण्यासाठी हे वृक्ष अडचणीचे ठरत असल्यामुळे वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे सोबत नाशिक पूर्व विभागातील पाच वृक्षांचीही तोड केली जाणार आहे. त्यांसदर्भात नागरिकांकडून नाशिक पूर्व कार्यालयात सात दिवसात हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
नवीन वृक्षलागवडीचा प्रस्ताव
शहरात आता एक वृक्ष तोडल्यास पाच वृक्षांची लागवड करण्याचे बंधन आहे. त्यानुसार महापालिकेने या १५४ वृक्षांच्या बदल्यात पाचपट नवीन वृक्षलागवड केली जाणार असल्याचा दावा केला आहे. तसेच येथे वड, पिंपळ व उंबर प्रजातीचे वृक्षांचे अन्यत्र पुनर्रोपण केले जाणार असल्याचा दावाही उद्यान विभागाने केला आहे.

