

निफाड : पुढारी वृत्तसेवा
निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रत्नमाला संपत कापसे यांनी ठरलेल्या रोटेशन पद्धतीनुसार आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी आता निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नाशिकचे रोटेशन पद्धतीचा मान राखत कापसे यांनी १९ जानेवारी २०२६ रोजी आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला होता.
हा राजीनामा स्वीकृत झाल्याने रिक्त पदावर नवीन नियुक्ती करण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला असून, या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी नवीन नगराध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
सत्तेच्या ठरलेल्या सूत्रानुसार आणि निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, नगराध्यक्ष पदाचे आरक्षण 'खुला (महिला)' प्रवर्गासाठीच कायम आहे.
जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, २९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत मुख्याधिकारी, निफाड नगरपंचायत यांच्या दालनात उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर दुपारी १२ वाजता प्राप्त अर्जाची छाननी केली जाईल.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ पर्यंतची मुदत देण्यात आली असून, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायत निफाडच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याच सभेत उमेदवारांची नावे वाचून दाखवून आवश्यक भासल्यास मतदान घेतले जाईल व त्यानंतर तत्काळ निकाल घोषित केला जाईल.