

हणजूण : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात येणारे पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर निसर्ग सौंदर्याचा व समुद्र स्नानाचा आनंद घेण्यासाठी येत असतात; परंतु काही पर्यटक या समुद्रकिनाऱ्याचा वापर मद्यपान करून मौजमजा-मस्ती करण्यासाठी करीत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे.
काही पर्यटक वागातोर समुद्रकिनाऱ्यावर रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत मद्यपान करीत असतात व पार्त्या करीत असतात. मद्यपान करून झाले की दारूच्या, बियरच्या बाटल्या /टीनचे कॅन्स तसेच पाण्याच्या, शीतपेयाच्या बाटल्या आणी खाद्यपदार्थाची रिकामी पाकिटे व इतर कचरा तसाच सोडून जातात याचा त्रास पहाटेच्या वेळी चालण्याचा व्यायाम करणाऱ्या पर्यटक व स्थानिकांना होत असतो.
अन्नपदार्थ खाण्याकरिता भटकी कुत्री व जनावरे यांचा वावर त्या ठिकाणी होत असतो. या समुद्रकिनाऱ्यावर गेल्या काही वर्षापासून ऑलिव्ह रीडले जातीची समुद्र कासवे अंडी घालण्यासाठी येतात हे वन खात्याच्या नोंदीवरून निष्पन्न झालेले आहे. पर्यटकांच्या रात्रीच्या वावरामुळे प्रजननासाठी येणाऱ्या या समुद्री कासवांना त्याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.