

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम काही भागामध्ये सुरू आहे. ताळगावातील रस्त्यांची चाळण झाली आहे. हे खड्डे बुजवण्याऐवजी पुन्हा नव्याने रस्त्याच्या बाजूने खोदकाम सुरू झाल्याने वाहन चालक तसेच रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. खडबडीत रस्ते यामुळे लहानसहान अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
पावसाळ्यापूर्वी ताळगाव परिसरात खोदकाम करण्यात आले, तेव्हा अनेक समस्यांना स्थानिक ग्रामस्थांना सामोरे जावे लागले. पावसाळा उलटून तीन महिने उलटले तरी रस्त्यांची डागडुजी झालेली नाही. सांपॉलकडून दुर्गागाडी जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर डांबरीकरण केले तरी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या सांपॉल मार्केटच्या रस्त्यांवर खोदकामानंतर अंतर्गत रस्त्यांवर खोदकाम सुरू झाले आहे.
या खोदकामाबाबत कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. वाहनांची कोंडी होत आहे. कधी तर मार्केट समोरील रस्ता कामासाठी बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे वाहन चालकांना हा रस्ता केव्हा बंद व कधी सुरू आहे याचा अंदाजच येत नाही. कंत्राटदार मात्र आपल्या मर्जीप्रमाणे हे रस्ता बंद करण्याचे प्रकार करत आहे यामुळे वाहन चालकांत संतापाची लाट आहे.
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात या काही कारणास्तव या मतदारसंघात लक्ष देऊ शकत नाही. मात्र, ताळगाव व पणजीवर वर्चस्व असलेल्या मंत्री बाबूश मोन्सेरात यांनीही या रस्त्यांच्या डागडुजीबाबत कधीच नागरिकांशी संवाद साधलेला नाही. सांपॉल मार्केट ते तांबडी माती सर्कलपर्यंतचा अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवले मात्र पुन्हा ते उखडले
पंच सदस्याच्या आशीर्वादाने कामे सुरू ?
शनिवार, रविवारच्या दिवशी सरकारी कार्यालये बंद असल्याने काही जण रस्त्यावर चर खोदत आहेत व आपली कामे विना परवाना करत आहेत. त्यांना पंचायतीकडून जाबही विचारला जात नाही. त्या भागातील संबंधित पंच सदस्याच्याच आशीर्वादाने ही सर्व काही सुरू आहे, अशी चर्चा नागरिकांत आहे.