

ठळक मुद्दे
अनेक दिग्गजांना धक्का ; तर अनेक माजी पदाधिकारी, सदस्यांचे गट खुले झाल्याने वाट सुखर
नव्याने निघालेल्या आरक्षणाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली
महिलांसाठी गट राखीव झाल्याने जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना धक्का
नाशिक : साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत सोमवारी (दि. १३) काढण्यात आली. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील एकूण ७४ गटांमध्ये ३७ जागा या महिलांसाठी राखीव आहेत. नव्याने काढण्यात आलेल्या प्रवर्गासाठी व महिलांसाठी गट राखीव झाल्याने जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे, तर दुसरीकडे अनेक माजी पदाधिकारी व सदस्यांचे गट खुले झाल्याने त्यांना वा कुटुंबातील सदस्यांची वाट सुकर झाली आहे. नव्याने निघालेल्या आरक्षणाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली. त्यामुळे अनेकांना 'लॉटरी' लागल्याने त्यांनी 'निवडणुकांचे फटाके' फोडत आनंदोत्सव साजरा केला.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. सुरुवातीला ७४ गटांचे विभाजन मांडण्यात आले. यात 'एसटी'साठी एकूण २९ गट, 'एससी'साठी पाच गट, 'ओबीसीं'साठी १९ आणि सर्वसाधारण प्रवर्गाला २१ गट हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने निश्चित करण्यात आले.
सुरुवातीला 'एससी'साठी राखीव पाच गटांची नावे जाहीर करण्यात आली. त्यानंतर 'एसटी', 'ओबीसी' आणि 'सर्वसाधारण' या प्रमाणे गटांचे आरक्षण ठरल्यानंतर प्रत्येक प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ५० टक्के जागांची निवड ही ईश्वरी चिठ्ठी पद्धतीने करण्यात आली. 'ओबीसीं'च्या १९ गट निश्चित करण्यासाठी ४० गटांच्या चिठ्ठ्या या बाटलीमध्ये टाकण्यात आल्या. त्यानंतर हर्षदा कुरे या चौथीच्या विद्यार्थिनीने १९ चिठ्ठ्या काढत अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या. याप्रमाणेच महिलांचेही आरक्षण निघाले. अर्पिता बोराडे या मुलीने 'एसटी महिलांचे' आरक्षण चिठ्ठ्या काढल्या. आरक्षण सोडत यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील संदीप दराडे, मधुकर पुंड, सुनील मुळे, संतोष जोशी, अमित पवार यांनी प्रयत्न केले. आरक्षण सोडतसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उदय जाधव, दीपक शिरसाठ, गोरख बोडके, कुणाल दराडे, विष्णुपंत म्हैसधुणे, गोकुळ गिते, विनायक माळेकर, भारत कोकाटे, तेज कवडे, अनिल ढिकले, अंकुश देवरे, उत्तम कातकाडे आदींचा समावेश होता.
जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता
शहरातील महाकवी कालिदास कलामंदिरात दुपारी १२ ला आरक्षण सोडतीस प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वत: या ठिकाणी हजर होते. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गटाच्या नावाची चिठ्ठी कॅमेरासमोर दाखविताना कॅमेरामन हा 'स्क्रीन'समोर येत होता. त्यामुळे मागे बसलेल्या लोकांना 'स्क्रीन' दिसत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्परता दाखवत स्वत: जागेवरून उठून कॅमेरामनला एका कोपऱ्यातील जागा निश्चित करून दिली आणि त्यानंतर प्रक्रिया पार पडली.
इच्छुकांनी घेतला काढता पाय
फिरत्या आरक्षण पद्धतीला 'ब्रेक' लावत नव्याने झालेल्या या आरक्षण सोडतीत काही ठिकाणच्या इच्छुकांचा हिरमोड झाला. तर काही इच्छुकांना अनपेक्षित 'लॉटरी' लागली. गट आरक्षित झाल्याचे लक्षात येताच निराश झालेल्या इच्छुकांनी तत्काळ सभागृह सोडणे पसंत केले तर, आपल्या सोयीचे आरक्षण निघाले म्हणून काही इच्छुकांनी आनंदोत्सव साजरा केला.
गटनिहाय आरक्षण असे...
नागरिकांचा मागास प्रवर्ग : कसबे सुकेणे, नांदूरशिंगोटे, पळसे, सोमठाणे, दाभाडी, वडाळीभोई, पाटोदा, जायखेडा, माळेगाव
नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला : कळवाडी, साकोरी, निंबायती, उगाव, ब्राह्मणगाव, चांदोरी, ठेंगोडे, खाकुर्डी, सायखेडा, दापूर, तळेगावरोही
अनुसूचित जाती : दुगाव व रावळगाव
अनुसूचित जाती महिला : एकलहरे, राजापूर, लासलगाव
अनुसूचित जमाती : आंबे, कोचरगाव, अहिवंतवाडी, हरसूल, हतगड, अंजनेरी, गिरणारे, धामणगाव, उमराळे बु., कसबे वणी, वीरगाव, खंबाळे, मोहाडी, वाडीवऱ्हे.
अनुसूचित जमाती महिला : उंबरठाण, अभोणा, पुनदनगर, ताहाराबाद, विल्होळी, नांदगाव सदो, मानूर, वडनेर भैरव, खेडगाव, कोहोर, ठाणापाडा, कनाशी, ठाणगाव
सर्वसाधारण : सौंदाणे, निमगाव, लोहोणेर, खर्डे वा., न्यायडोंगरी, भालूर, नगरसूल, मुखेड, पालखेड, नांदूरमध्यमेश्वर, घोटी बु., ठाणगाव
सर्वसाधारण महिला : नामपूर, झोडगे, उमराणे, धोडांबे, साकोरे, जातेगाव (नांदगाव), अंदरसूल, विंचूर, मुसळगाव