नाशिक : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. १५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी विभागाने तीन हजार २८० मतदान केंद्रे प्रस्तावित केली आहेत.
मागील निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या दोन हजार ६४६ होती. यंदा त्यात ६३४ केंद्रांची भर पडली आहे. निफाड व मालेगाव तालुक्यांत सर्वाधिक मतदान केंद्रे आहेत. दि. १ जुलै २०२५ ची मतदारसंख्या ही २७ लाख ९३ हजार ४७२ आहे. त्यात किती लोकसंख्या वाढते अन् कमी होते याकडे लक्ष लागले आहे.
राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दि. १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदारयादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होईल. त्यावर १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदारयादी व मतदान केंद्रनिहाय मतदारयादी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून ३,२८० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदारयाद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदारयाद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे, नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदारयाद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभाग यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरुस्त्या हरकती व सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येतात.
तालुकानिहाय मतदान केंद्रे अशी...
बागलाण (३०५), मालेगाव (३७६), देवळा (१२८), कळवण (१७७), सुरगाणा (१७२), पेठ (१२४), दिंडोरी (२६९), चांदवड (१९८), नांदगाव (१७८), येवला (२३०), निफाड (३३४), नाशिक (१६३), त्र्यंबकेश्वर (१४५), इगतपुरी (२१४), सिन्नर (२६७).