नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गट-गणांसाठी प्रारूप मतदार याद्या बुधवार (दि. ८) तालुकानिहाय प्रसिद्ध करण्यात आली. यात 27 लाख 93 हजार 472 मतदार हे निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजाविणार आहे. प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांवर 14 ऑक्टोबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या असून त्यावर सुनावणी होऊन २८ ऑक्टोबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
जिल्हा परिषद गट, गण आरक्षण सोडत 13 ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे तर, गट, गण प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर राज्यात निवडणुकांचा बार उडणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडतील, असा अंदाज आहे. त्यामुळे यंत्रणा कामाला लागल्या असून इच्छुकांच्या तयारीलाही आता वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बुधवारी गट- गणांच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. देशपातळीवर सध्या मतदार याद्यांमधील गोंधळाचा मुद्दा गाजत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या मुद्यावरून फटका बसायला नको म्हणून इच्छुकही आता अलर्ट झाले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ च्या विधानसभेच्या याद्या ग्राह्य धरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद व पंधरा पंचायत समित्यांमध्ये मतदारांची संख्या साधारणतः २७ लाख ९३ हजार ४७२ इतकी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात ७४ गट व १४८ गणांमध्ये एकाचवेळी या याद्या प्रसिद्ध होतील. १४ तारखेपर्यंत नागरिकांना या यादीवर हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबरला अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी केली जाईल.
नगरपालिकांचे प्रभाग आरक्षण सोडत
जिल्ह्यातील ११ परिषदांमधील प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्याही बुधवारी प्रसिद्ध करण्यात आल्या. या याद्यांवर हरकत व सूचना नोंदविता येणार असून २८ ऑक्टोबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहे. तर, नगरपालिकांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडत प्रक्रिया बुधवारी (दि.8) राबविण्यात आली असून आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
पंचायत समितीनिहाय मतदारसंख्या (1 जुलै 2025)
बागलाण (2 लाख 66 हजार 277), मालेगाव (3 लाख 18 हजार 49), देवळा (1 लाख 10 हजार 201), कळवण (1 लाख 61 हजार 507), सुरगाणा (1 लाख 37 हजार 695), पेठ (87 हजार 864), दिंडोरी (2 लाख 23 हजार 459), चांदवड (1 लाख 71 हजार 947), नांदगाव (1 लाख 56 हजार 828), येवला (1 लाख 79 हजार 43), निफाड (3 लाख 67 हजार 2), नाशिक (1 लाख 55 हजार 168), त्र्यंबकेश्वर (1 लाख 16 हजार 6), इगतपुरी (1 लाख 74 हजार 845), सिन्नर ( 2 लाख 27 हजार 511).